पणजी : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोवा राज्याची आगामी काळात शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातही वेगळी ओळख निर्माण होणार आहे. राज्यात मत्स्यपालन महाविद्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सरकार सुरू करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू), गोव्याच्या डॉक्टरेट अभ्यासक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, डब्ल्यूपीयू-एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड, डब्ल्यूपीयू गोवाचे अध्यक्ष सुरेश गरीमाला, कुलगुरू वॉल्टर लीअल, सतीश त्रिपाठी, डी. शिवकुमार, डीआरडीओचे माजी अध्यक्ष समीर कामत आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात तीन संशोधन तज्ज्ञांचा डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच अॅरिझोना विद्यापीठ आणि डब्ल्यूपीयू यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
उच्च शिक्षण आणि संशोधनाला चालना
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, देशातील तसेच परदेशातील विद्यार्थी आणि संशोधकांना आकर्षित करण्याची क्षमता गोव्यात आहे. उच्च शिक्षण संस्था आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधांच्या विकासातून राज्याची शैक्षणिक क्षेत्रातील ओळख अधिक मजबूत होईल.
गोवा हे लहान राज्य असून, आतापर्यंत त्याची ओळख प्रामुख्याने पर्यटनासाठी राहिली आहे. मात्र, आगामी काळात गोव्याची ओळख शिक्षणासाठीही निर्माण होईल. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) यांसारख्या संस्थांच्या विकासामुळे गोव्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक ओळख अधिक व्यापक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात फोंडा येथे एनआयटीचा पूर्ण क्षमतेने कार्यरत असलेला परिसर सुरू झाला. तसेच फर्मागुडी येथे आयआयटी पूर्ण परिसर उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. राज्यातील पहिले सरकारी कृषी महाविद्यालय आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले असून, आता मत्स्यपालन महाविद्यालय स्थापन करण्याचा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉक्टरेटच्या विद्यार्थ्यांनी गोव्याचा समुद्रकिनारा आणि नद्यांची परिसंस्था, पश्चिम घाटातील जैवविविधता, हवामान बदल, शाश्वत पर्यटन, सार्वजनिक आरोग्य, सर्वसमावेशक विकास, कोकणी भाषा आणि गोव्याची संस्कृती अशा विषयांवर संशोधन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
गोव्यातील संस्थांमध्ये संशोधन सहकार्य
भावी पिढ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विविध क्षेत्रांतील शैक्षणिक संस्था गोव्यात स्थापन करण्यावर सरकारचा भर आहे. डब्ल्यूपीयूच्या डॉक्टरेट अभ्यासक्रमांमुळे संशोधक गोव्यात येतील. तसेच डब्ल्यूपीयू, गोवा विद्यापीठ, आयआयटी गोवा आणि एनआयटी गोवा या संस्थांमधील संशोधन सहकार्याला चालना मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.


