‘डेव्हलपमेंट डायलॉग्स’ पुस्तकाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत दत्तराज साळगावकर, दीप्ती साळगावकर, यतीन काकोडकर व डॉ. पुष्कर.
पणजी : गोवा स्टार्टअप धोरण २०२५ अंतर्गत राज्यात एक हजार स्टार्टअप सुरू करून गोमंतकीयांसाठी १० हजार रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित गोवा घडवण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पणजीतील आल्तिनो येथील सुनापरान्त गोवा कला दालनात उद्योजक आणि व्ही. एम. साळगावकर उद्योग समूहाचे अध्यक्ष दत्तराज साळगावकर यांनी लिहिलेल्या ‘डेव्हलपमेंट डायलॉग्स’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मोपा विमानतळ, पर्वरी उड्डाणपूल, झुआरी पूल आणि अटल सेतू यांसारख्या प्रकल्पांमुळे राज्यातील रस्ते आणि वाहतूक जोडणी सुधारल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. वास्को आणि मडगाव येथे अमृत योजनेअंतर्गत विकासकामे सुरू आहेत. वंदे भारत रेल्वे सेवेमुळे गोव्याची मुंबई आणि बंगळुरूशी जोडणी अधिक सुलभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.
गोव्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तुये येथे सुमारे ६ लाख चौ.मी. क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्लस्टर उभारण्याचे प्रस्तावित आहे. या क्लस्टरमध्ये सेमीकंडक्टर, एरोस्पेस, ड्रोन आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रांना प्राधान्य दिले जाणार आहे. गोवा कृत्रिम बुद्धिमत्ता अभियान २०२७, इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणारे धोरण आणि ग्रामीण भागातील पर्यावरणपूरक पर्यटनालाही चालना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डिजिटल प्रशासनावर भर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याच्या ऑनलाईन पोर्टलवर २४० हून अधिक सरकारी सेवा उपलब्ध असून, ८.७ लाखांपेक्षा जास्त वापरकर्ते त्यांचा लाभ घेत आहेत. ‘स्वयंपूर्ण गोवा’, ‘सरकार तुमच्या दारी’ आणि ‘सेवा संकल्प’ या उपक्रमांतून सरकारी सेवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दोन लाख लाभार्थ्यांना आर्थिक मदत
‘गृह आधार’ आणि ‘दीनदयाळ सामाजिक सुरक्षा’ योजनांअंतर्गत सुमारे दोन लाख लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाते. ‘लाडली लक्ष्मी’, ‘अटल आसरा’, ‘गगन भरारी’ आणि ‘सरल विद्या सहाय्य’ या योजनांचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.
सरकारचा विकास आराखडा अंत्योदयाच्या तत्त्वावर आधारित असून, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचे लाभ पोहोचवणे हे उद्दिष्ट आहे. महिला, तरुण आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण करून गोव्याला नावीन्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि स्वयंपूर्ण राज्य बनवण्याचा सरकारचा प्रयत्न अाहे.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री


