पत्रकार परिषदेत माहिती देताना सागर गांजेकर. सोबत जानू दमेकर, ज्योतिबा गेवडे, विशांत वेळीप व इतर.
फोंडा : कुळे येथील दूधसागर सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्थेत १९ लाखांहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस येऊनही संबंधित माजी महिला सचिवावर कारवाई झालेली नाही. याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात कुळे पोलीस आणि सहकार उपनिबंधकांकडे तक्रारी करूनही सरकारी यंत्रणांकडून ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणात लक्ष घालून दूध उत्पादकांना न्याय द्यावा, अशी मागणी संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव ऊर्फ सागर गांजेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला जानू दमेकर, ज्योतिबा गेवडे आणि विशांत वेळीप उपस्थित होते. संस्थेत गेल्या दोन वर्षांत सचिव म्हणून काम करणाऱ्या महिलेने कथित आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेच्या अध्यक्षांच्या सह्यांचा वापर करून अनेक धनादेशांद्वारे बँक खात्यातून रक्कम काढण्यात आली. तसेच संस्थेच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेले काही ठराव बदलण्यात आल्याचा आरोपही गांजेकर यांनी केला.
काही सदस्यांना संशय आल्याने त्यांनी तपासणी केली असता संबंधित महिलेने रक्कम काढल्याचे मान्य करून ती परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, रकमेची परतफेड न झाल्याने ऑगस्ट महिन्यात पोलिसांकडे आणि सहकार उपनिबंधकांकडे तक्रारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नरेश शिगावकर यांनी संस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्याची गरज व्यक्त केली. कथित घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी दूध उत्पादक करीत आहेत. मात्र, तक्रार कुठे दाखल करावी याबाबत सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांकडून कुशावती जिल्ह्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला जात असल्याने दूध उत्पादकांचा वेळ वाया जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
हिशेब तपासणी रखडली; दूध उत्पादक अडचणीत
संस्थेची गेल्या दोन वर्षांपासून हिशेब तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच नवीन समिती निवडण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली नसल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. गोवा डेअरीकडूनही आवश्यक ती पावले उचलण्यात आली नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या दूध उत्पादकांना देय रक्कम देण्यासाठी संस्थेकडे पुरेसा निधी नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.


