पणजी : जे लाभार्थी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ रेशन घेत नाहीत, त्यांच्या रेशन कार्डाबाबत कारवाई करण्यात येणार आहे. सहा महिने रेशन न घेतल्यास संबंधित रेशन कार्ड निष्क्रिय केले जाईल. त्यामुळे लाभार्थ्यांना रेशनसह इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासंदर्भात नागरी पुरवठा खात्याकडून लवकरच सार्वजनिक सूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
ऑक्टोबरपासून देशभरातील अशा निष्क्रिय रेशन कार्डांची तपासणी करून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
रेशनचा नियमित लाभ न घेणाऱ्या कार्डधारकांची संख्या कमी करण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्याचा लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यांपासून रेशन न घेतलेल्या कार्डधारकांची नोंद तपासण्यात येणार असून, संबंधित रेशन कार्डांबाबत नियमानुसार निर्णय घेतला जाऊ शकतो.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून रेशनचा लाभ न घेतलेल्या नागरिकांनी आपल्या रेशन कार्डाची स्थिती तपासणे आवश्यक आहे. तसेच गरज असल्यास स्वस्त धान्य दुकानातून नियमितपणे धान्य घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. या कारवाईमुळे निष्क्रिय कार्डांची छाननी होऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभ अधिक अचूकपणे पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
याबाबत अधिक माहिती देताना नागरी पुरवठा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सहा महिन्यांपर्यंत रेशन न घेणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ तात्पुरता बंद करण्यात येईल. मात्र, त्यांचे रेशन कार्ड कायमस्वरूपी रद्द केले जाणार नाही.
ई-केवायसीनंतर पुन्हा करता येणार सक्रिय
सहा महिन्यांपर्यंत रेशन घेतले नाही तर कार्ड निष्क्रिय होईल. ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या आत ई-केवायसी पूर्ण करावी लागेल. त्यानंतरच कार्ड पुन्हा वापरण्यायोग्य होऊन लाभार्थ्यांना रेशनचा लाभ घेता येईल. यासंदर्भात खात्याकडून काही दिवसांत सार्वजनिक सूचना जारी करण्यात येणार असून, त्यानंतरच प्रत्यक्ष कारवाई सुरू केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.


