पणजी : गोवा अबकारी खात्याने मध्यरात्रीच्या सुमारास केलेल्या मोठ्या कारवाईत पत्रादेवी अबकारी तपासणी नाक्यावर अवैध दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडला. या कारवाईत तब्बल ३२ लाख ४० हजार रुपये किमतीच्या ‘गोवा व्हिस्की’च्या ५०० पेट्या जप्त करण्यात आल्या. दारू लपविण्यासाठी ती करवंट्यांच्या पोत्यांखाली ठेवण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे १२.३० वाजता अबकारी अधिकाऱ्यांनी संशयावरून आरजे-११-जीडी-४०५२ क्रमांकाचा ट्रक अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये करवंट्यांच्या पोत्यांखाली मोठ्या प्रमाणात दारू लपविल्याचे आढळून आले. अधिक तपासणी केल्यानंतर ‘गोवा व्हिस्की’च्या एकूण ५०० पेट्या सापडल्या.
जप्त केलेल्या अवैध मद्याची किंमत ३२ लाख ४० हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रकची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे. त्यामुळे या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ५७ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.
ही कारवाई अबकारी अधीक्षक शंभा के. नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांना अबकारी निरीक्षक सलील वळवईकर, उपनिरीक्षक संजय नाईक तसेच अबकारी रक्षक समीर नाईक, शुभम शिरोडकर, औदुंबर पेडणेकर आणि प्रितेश मळीक यांनी सहकार्य केले.
बेकायदा मद्याची वाहतूक रोखण्यासाठी अबकारी विभागाकडून सीमावर्ती तपासणी नाक्यांवर अधिक सतर्कता बाळगली जात आहे. पत्रादेवीतील या कारवाईमुळे अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


