पणजी : बदलत्या गोव्याचे वास्तव विनोदाच्या माध्यमातून मांडणाऱ्या ‘गुड बाय मिस्टर डिमेलो’ या आगामी चित्रपटाला इफ्फीच्या ‘व्हेव फिल्म बाजार २०२६’मध्ये दोन पुरस्कार मिळाले आहेत. याआधी या चित्रपटाची निवड फिल्म बाजारच्या को प्रोडक्शन मार्केट या विभागात झाली होती. या चित्रपटाला एनएफडीसीकडून ५ हजार यूएस डॉलर आणि मुकेश छाब्रा कास्टिंग पुरस्कार मिळाले आहेत. कास्टिंग पुरस्कारामध्ये मोफत कास्टिंग सेवा देण्यात येते.
चित्रपटाचे दिग्दर्शन रिधम जानवे करणार आहेत, तर रिधम जानवे आणि मायाभूषण नागवेकर यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. चित्रपट कोकणी, इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये तयार केला जाणार आहे.
फिल्म बाजारसाठी पाच देशांतील आणि १५ भाषांमधील एकूण २० चित्रपट प्रकल्पाचा निवड करण्यात आली होती. विकास कुमार, खान अँड कुमार मीडिया या निर्मिती संस्थेचे शरीब खान आणि मायाभूषण नागवेकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. खान अँड कुमार मीडिया निर्मित सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज (२०२५) आणि लव्हर्स इन द ब्लू नाइट (२०२६) या चित्रपटांनी व्हेनिस चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवले आहेत. जानवे यांना ‘हंटर्स मुन’ या चित्रपटासाठी शांघाय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा गोल्डन गॉब्लेट पुरस्कार मिळाला आहे.
....
गोव्याच्या बदलत्या समाजजीवनाचे टिपणार पैलू...
‘गुड बाय मिस्टर डिमेलो’मध्ये संक्रमणाच्या टप्प्यातून जाणाऱ्या गोव्याचे चित्र विनोदी, पण तितक्याच मार्मिक पद्धतीने मांडण्यात येणार आहे. गोव्याच्या बदलत्या सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तवाचे दर्शन घडवणारा हा चित्रपट ठरणार आहे. फिल्म बाजाराच्या को प्रोडक्शन विभागात निवड झालेल्या चित्रपटांना आपली कथा, निर्मितीची संकल्पना आणि आर्थिक गरजा संभाव्य आंतरराष्ट्रीय भागीदारांसमोर मांडण्याची संधी मिळते. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती, आर्थिक पाठबळ आणि जागतिक चित्रपट क्षेत्रातील संपर्कचि मार्ग खुले होतात.


