सस्पेन्स, ड्रामा, रोमान्सचा आठवडा

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
11th November, 11:23 pm
सस्पेन्स, ड्रामा, रोमान्सचा आठवडा

मनोरंजन विश्वात या वीकेंडला ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर धमाका होणार आहे. नेटफ्लिक्स, जिओ-हॉटस्टार, झी५, सोनी लिव्ह आणि ॲपल टीव्ही प्लस यांसारख्या प्रमुख प्लॅटफॉर्म्सवर शुक्रवारी विविध विषयांवरील चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. करीना कपूर खानच्या थरारपटापासून ते पंकज त्रिपाठी यांच्या हलक्याफुलक्या रोमँटिक कॉमेडीपर्यंत, या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी पर्वणी उपलब्ध असणार आहे.


दायरा । नेटफ्लिक्स
मेघना गुलजार दिग्दर्शित हा एक तपासात्मक क्राइम ड्रामा आहे. चार बलात्कार संशयितांचा एन्काउंटर केल्यानंतर डीसीपी रमण कुमार (पृथ्वीराज सुकुमारन) हे चर्चेत येतात. मात्र, हा एन्काउंटर बनावट होता का, याचा तपास करण्यासाठी डीसीपी अजुनी कोहली (करीना कपूर खान) यांची अंतर्गत दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाते. दोन उच्च पोलीस अधिकाऱ्यांमधील हा संघर्ष आणि तपासाची कथा या चित्रपटात पाहायला मिळेल.


हार्टलँड । नेटफ्लिक्स
जवळपास दोन दशकांनंतर संगीत विश्वात परतणारी माजी कंट्री म्युझिक स्टार मिस्टी जोन्स (जेसिक चॅस्टेन) हिची भाची चार्ली हार्ट (कार्टर फेथ) अचानक गायब होते. भाचीचा शोध घेताना एका हत्येचा खुलासा होतो. संगीत क्षेत्रातील गडद रहस्ये आणि मिस्टीच्या भूतकाळातील घटनांवर आधारित हा थ्रिलर ड्रामा आहे.


पा​रिवारिक मनुरंजन । सोनी लिव्ह
लखनौमधील मनमोकळ्या स्वभावाचा तरुण रंजन (पंकज त्रिपाठी) आणि दिल्लीतील कडक शिस्तीची प्रॉपर्टी मॅनेजर हेलन (अदिती राव हैदरी) एका ऐतिहासिक हवेलीत एकत्र राहू लागतात. भिन्न स्वभावाच्या या दोघांमध्ये सुरुवातीला खटके उडतात, परंतु हळूहळू प्रेमाची पालवी फुटते. त्यांच्या या प्रवासात शेजाऱ्यांची चर्चा आणि पोलिसांचा तपास कसा गोंधळ निर्माण करतो, हे या हलक्याफुलक्या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.


१२ १२ १२ । ॲपल टीव्ही
झुरिकमधील एका अंडरग्राउंड बँकेत पडलेल्या दरोड्यावर आधारित ही मालिका तीन वेगवेगळ्या कालखंडात (टाइमलाइन्स) उलगडते. दरोड्याच्या १२ महिने आधीची तयारी, तो पूर्ण करण्यासाठी लागलेले १२ तास आणि त्यानंतरचे १२ दिवस. एका निष्णात गुन्हेगाराची (जेमी डॉर्नन) योजना आणि त्याचा पाठलाग करणारा एफबीआय एजंट (ॲंथोनी मॅकी) यांच्यातील हा सामना थरारक आहे.


स्टुडंट ऑफ द इयर: आफ्टर डार्क । जिओ-हॉटस्टार
आपल्या जुळ्या बहिणीच्या (आयेशा) रहस्यमय मृत्यूनंतर आदिती (शनाया कपूर) सत्याचा शोध घेण्यासाठी स्वतः विद्यार्थी बनून एका उच्चभ्रू बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घेते. ‘स्टुडंट ऑफ द इयर’ स्पर्धेत भाग घेत असतानाच ती गुप्त रहस्ये, विश्वासघात आणि वादाच्या भोवऱ्यात अडकत जाते.


बांदरा । झी५
१९९० च्या दशकातील बॉलीवूड स्टार तारा जानकी (तमन्ना भाटिया) हिच्या गूढ मृत्यूचा शोध घेणारा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट निर्माता या कथेच्या केंद्रास्थानी आहे. फ्लॅशबॅकद्वारे ताराचा भूतकाळ, तिचा केरळमधील व्यावसायिक आला (दिलीप) याच्यासोबतचा प्रवास आणि तिच्या मृत्यूनंतर आलाने घेतलेला सूड, असा थरारक प्रवास यात मांडण्यात आला आहे.


मर्डर इन गॅलिसिया । नेटफ्लिक्स
एका महिलेवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर सुरू होणाऱ्या तपासावर ही मिनी-सीरिज आधारित आहे. एका महिलेच्या पतीवरच संशयाची सुई जाते, ज्याच्या निष्पाप वर्तनामागे अनेक रहस्ये दडलेली असतात. वास्तववादी घटनांवर आधारित ही मालिका सस्पेन्सने भरलेली आहे.


बीइंग ह्युमन । ॲपल टीव्ही
दिव्यांग हक्क कार्यकर्त्या जुडी ह्युमन यांच्या जीवनावर आणि १९७७ मधील सॅन फ्रान्सिस्को येथील आंदोलनावर आधारित हा बायोपिक ड्रामा आहे. सरकारने कायदा लागू करण्यास नकार दिल्यानंतर जुडी यांच्या नेतृत्वाखाली २८ दिवस चाललेल्या संघर्षाची ही प्रेरणादायी कथा आहे.