अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बसचालकाला १३ वर्षांची शिक्षा

मेरशी येथील पोक्सो न्यायालयाचा निकाल; १.४० लाखाचा दंड

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
10 mins ago
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बसचालकाला १३ वर्षांची शिक्षा

पणजी : बस प्रवासादरम्यान झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेऊन फोंडा तालुक्यातील १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मेरशी येथील पोक्सो न्यायालयाने ३७ वर्षीय विवाहित बसचालकाला १३ वर्षे सश्रम कारावास आणि १.४० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्या. डॉ. पूजा कवळेकर यांनी हा निवाडा दिला.
ही घटना २०२३ मध्ये घडली होती. १५ ऑगस्ट रोजी मुलगी घरातून निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी म्हार्दोळ पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. मुलगी घरी परतल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली असता, प्रवासादरम्यान बसचालकाशी ओळख झाल्याचे समोर आले. संशयिताने या ओळखीचा गैरफायदा घेत तिला कारमधून शिरदोन समुद्रकिनारी आणि इतर ठिकाणी नेले. कारचे दरवाजे बंद करून तिला डांबून ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. १७ ऑगस्ट रोजी त्यानेच तिला घरी सोडले. त्यावेळी कुटुंबीयांशी झालेल्या वादानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
म्हार्दोळ पोलिसांनी तपास पूर्ण करून ७ ऑक्टोबर २०२३ रोजी आरोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता अर्चना भोबे आणि शिल्पा नागवेकर यांनी वैद्यकीय अहवालासह पुरावे सादर केले. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांची साक्ष महत्त्वाची ठरली. मुलीने संमती नसताना जबरदस्तीने अत्याचार केल्याचे न्यायालयात सांगितले. मात्र, मुलगी आरोपीसोबत स्वेच्छेने गेल्याचे नमूद झाल्याने न्यायालयाने अपहरणाच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता केली.
विविध कलमांखाली शिक्षा
न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत १० वर्षे, तर पोक्सो कायद्याच्या कलम ४ अंतर्गत १३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याशिवाय भादंसंच्या कलम ३४२ अंतर्गत एक वर्ष आणि पोक्सोच्या कलम ८ व १२ अंतर्गत अनुक्रमे ५ व २ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. विविध कलमांखाली एकूण १.४० लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या असल्याचे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.