काणकोणात चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

२४ वर्षीय संशयिताला पहाटे अटक; गुन्हा दाखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
15 mins ago
काणकोणात चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पैंगीण : म्हापसा येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने राज्यात संताप व्यक्त होत असतानाच काणकोणमध्ये ४ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोहम्मद हुसेन (२४, मूळ बिहार) याला बुधवारी पहाटे अटक केली. तो पीडित मुलीच्या शेजारील खोलीत राहत होता.
काणकोणचे उपअधीक्षक नीलेश राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दोन दिवसांपूर्वीच गोव्यात आला होता. मंगळवारी रात्री ९.३० ते १०.३० च्या दरम्यान मुलगी घराबाहेर खेळत असताना त्याने फोनवर काहीतरी दाखवण्याचे आमिष दाखवून तिला खोलीत बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. मुलगी रडत आईकडे गेल्यानंतर पालकांनी बुधवारी पहाटे २ वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू करून पहाटे ४.३० वाजता संशयिताला अटक केली. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६५(२), गोवा बाल कायद्याचे कलम ८(२) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची आणि संशयिताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून मुलगी सध्या पालकांसोबत आहे.
निवासी भागांतही पिंक फोर्सची गस्त वाढवा
या घटनेचा विविध स्तरांतून निषेध होत आहे. समाजसेवक व युवा नेते शुभम कोमरपंत यांनीही संताप व्यक्त केला. समुद्रकिनारे आणि बाजारपेठांपुरती गस्त मर्यादित न ठेवता निवासी भागांतही ‘पिंक फोर्स’ची गस्त वाढवावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.