मडगाव : मडगाव नगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनासाठी ५३ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून मडगाव नगरपालिका इमारतीचा पुनर्विकास आणि बहुउद्देशीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी सल्लागार नियुक्त करण्याकरिता ई-निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत.
नगर विकास आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी नगर विकास खाते आणि गोवा राज्य नागरी विकास प्राधिकरणाने (सुडा) महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मडगाव नगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापन निधीतून ५३ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या निधीतून ७.५ घनमीटर क्षमतेचे आधुनिक कचरा संकलन वाहन खरेदी केले जाणार आहे. नगर विकास संचालक ब्रिजेश मणेरकर यांनी या संदर्भातील प्रशासकीय मंजुरीचा आदेश जारी केला आहे. ही खरेदी ‘जेम’ पोर्टलद्वारे करण्याचे निर्देश नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मडगाव येथील ऐतिहासिक नगरपालिका इमारतीचा कायापालट करण्याची तयारी सुरू झाली आहे. इमारतीचा पुनर्विकास, परिसराचे सुशोभीकरण, लँडस्केपिंग, आधुनिक रोषणाई आणि सार्वजनिक सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी सल्लागार सेवांची ई-निविदा मागवण्यात आली आहे. निविदा अर्जाची किंमत ५ हजार रुपये, प्रक्रिया शुल्क ३ हजार रुपये आणि अनामत सुरक्षा रक्कम २५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. मागील पाच वर्षांत किमान ५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा अनुभव आणि २५ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना निविदेत सहभागी होता येणार आहे.
बहुउद्देशीय क्रीडा संकुल...
मडगावमध्ये ५,७८९ चौरस मीटर जागेवर बहुउद्देशीय क्रीडा संकुल उभारण्याची योजना आहे. या संकुलात फुटसाल मैदान, मर्चंट, पिकलबॉल कोर्ट, वॉकिंग ट्रॅक आणि मनोरंजनाच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रकल्पाचे सर्वेक्षण, आराखडा तयार करणे आणि कामाच्या देखरेखीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यात येणार आहेत. यासाठी १५ कोटी रुपयांच्या इनडोअर स्टेडियम किंवा फुटबॉल मैदानाच्या प्रकल्पाचा अनुभव आणि किमान ५० लाख रुपयांची वार्षिक उलाढाल असणे आवश्यक आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी ऑनलाइन निविदा सादर करण्याची अंतिम मुदत २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे, तर २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजल्यानंतर तांत्रिक निविदा उघडण्यात येणार आहेत. इच्छुक कंपन्यांना गोवा सरकारच्या ई-निविदा संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहेत.


