वास्को : बायणा येथील एमपीटी मैदानासमोरच्या रस्त्याकडेला ठिकठिकाणी गोळा केलेला कचरा ओतण्यात येत असल्याने तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी संबंधित पालिका अधिकाऱ्याने योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.
यापूर्वी कचरा गोळा करण्याचे केंद्र बायणातील मासळी मार्केटसमोर होते. मात्र तेथे कचरा रस्त्यावर पसरू लागल्याने सदर केंद्र तेथून हटविण्यात आले. त्या ठिकाणी सौंदर्यीकरण करताना पेव्हर्स बसविण्यात आले. बायणातील मासळी मार्केटसमोर असलेले कचरा गोळा करण्याचे केंद्र हे एमपीटी मैदानासमोरच्या रस्त्याकडेला हलविण्यात आले. ठिकठिकाणी गोळा करण्यात आलेला कचरा त्या ठिकाणी ओतण्यात येतो. त्यानंतर तो मुरगाव पालिकेच्या कचरावाहू ट्रकातून सडा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेण्यात येतो.
ओल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी
एमपीटी मैदानासमोरच्या रस्त्याकडेच्या केंद्रात ओला, सुका कचरा ओतण्यात येतो. ओल्या कचऱ्यामुळे तेथे दुर्गंधी पसरत आहे. या मार्गाने दररोज शेकडो पादचारी ये-जा करतात. त्यांना या ठिकाणी नाक मुठीत धरून पुढे जावे लागते. या ठिकाणी काही जण बांधकामाचे टाकाऊ साहित्य तसेच इतर साहित्य टाकत आहेत. तसेच कचरा रस्त्याकडेला पसरलेला दिसतो. या संबंधी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.


