सांगे : कुडचडे-काकोडा येथील औद्योगिक वसाहतीत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला गोव्यात आणले आणि निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी मध्यप्रदेशातील रॉबिन मार्क्स (३०) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयिताने महिलेला काकोडा औद्योगिक वसाहतीतील निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
काँग्रेसकडून कठोर कारवाईची मागणी
या घटनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अमित पाटकर यांच्या पत्नीने काँग्रेस कार्यकर्त्यांसह कुडचडे पोलीस स्थानकाला भेट देऊन कारवाईची मागणी केली. गोव्यात अशा घटना घडत असल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी सतर्क राहून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच स्थलांतरित कामगारांची ओळख आणि नोंदणी अधिक प्रभावीपणे करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.


