म्हापशातील लैंगिक अत्याचारातील आरोपी गजांआड

पणजी बसस्थानकावरून अटक : न्यायालयाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी


18 mins ago
म्हापशातील लैंगिक अत्याचारातील आरोपी गजांआड

पुंडलिक गुडगेला अटक करून नेताना म्हापसा पोलीस.

म्हापसा : दिवाळीच्या दिवशी म्हापसा शहरात चार वर्षीय बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तीन दिवसांनी छडा लावण्यात म्हापसा पोलिसांना यश आले आहे. पुंडलिक गुडगे (२८, मूळ धारवाड, कर्नाटक) असे संशयिताचे नाव असून, बुधवारी सकाळी ७ वा. पणजी कदंब बसस्थानकावरून त्याला अटक करण्यात आली. म्हापसा न्यायालयाने संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेनंतर म्हापसा पोलिसांनी संशयिताचा शोध घेण्यासाठी बाजारपेठेतील फेरीवाले, हमाल आणि इतर परिचितांकडे चौकशी केली. घटनास्थळासह परिसरातील दारूच्या दुकानांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिसांनी २०० हून अधिक फुटेजची तपासणी करून संशयिताची ओळख पटवली.
संशयिताला कन्नड भाषाच येत असल्याने त्याच्या एका कन्नड भाषिक मित्राची पोलिसांनी मदत घेतली. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर संशयित पणजी किंवा मडगाव बसस्थानकावर असण्याची शक्यता व्यक्त झाली. त्यानुसार पोलिसांची पथके दोन्ही ठिकाणी रवाना झाली. बुधवारी सकाळी पणजी बसस्थानकावर झोपलेल्या अवस्थेत संशयित आढळल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.
८ रोजी रात्री ८ ते ९.३० दरम्यान ही घटना घडली होती. पीडित बालिका वडील आणि एका नातेवाईकासह म्हापसा बसस्थानकाजवळील बाजारपेठेच्या प्रवेशद्वारावर होती. वडील दारू आणण्यासाठी गेले असताना बालिका त्यांची वाट पाहत रडत बसली होती. त्यावेळी संशयिताने वडिलांकडे नेण्याचे आमिष दाखवून तिला सोबत नेले. त्यानंतर जवळच्या जीर्णावस्थेतील पडिक इमारतीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेची कलमे १३७(२), ६५(२), गोवा बाल हक्क कायद्याची कलमे ८ व ८(२) तसेच पोक्सो कायद्याची कलमे ४, ६, ८, १० व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिसांना एक बॅग, चादर आणि पीडितेचे कपडे सापडले आहेत. फॉरेन्सिक पुरावे गोळा करून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पीडितेवर गोमेकॉत उपचार सुरू असून समुपदेशक आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.
पोलीस अधीक्षक आशिष शिरोडकर, निरीक्षक अनंत गावकर, संजीत कांदोळकर, महेश गडेकर, उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, अजय धुरी, मंदार परब, विराज कोरगावकर, मंगेश पाळणी, रविना सावतोडकर, माधव नाईक तसेच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
संशयित बसस्थानकांवर घेत होता आसरा
आरोपी पुंडलिक गुडगे गेल्या दहा वर्षांपासून गोव्यात हमाली तसेच इतर छोटी-मोठी कामे करत होता. बेघर असल्याने तो बाजारपेठ किंवा बसस्थानकांवर झोपत असे. संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून संशयित त्याच रात्री म्हापशातून पायी पणजीच्या दिशेने गेल्याचे समोर आले. दरम्यान, पीडितेच्या वडिलांचे म्हापसा बाजारपेठेत एका व्यक्तीशी भांडण झाले होते. या भांडणादरम्यान त्यांची संशयिताशी तोंडओळख झाली होती. घटनास्थळी पोलिसांना एक बॅग, चादर आणि पीडितेचे कपडे आढळून आले होते.‍