सरकारी खात्यांमध्ये २,६५७ अप्रेंटिसची होणार भरती

एलडीसी, एमटीएससह विविध पदांचा समावेश

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
11th November, 11:52 pm
सरकारी खात्यांमध्ये २,६५७ अप्रेंटिसची होणार भरती

पणजी : राज्यातील सरकारी खाती, महामंडळे, रवींद्र भवन आणि अन्य स्वायत्त संस्थांमध्ये एकूण २,६५७ प्रशिक्षणार्थींची (अप्रेंटिस) भरती करण्यात येणार आहे. यामध्ये क्लार्क (एलडीसी), एमटीएस, ऑफिस एक्झिक्युटिव्ह आणि व्यावसायिक पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना १४ ते १७ नोव्हेंबरदरम्यान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना (एनएपीएस) पोर्टलवर अर्ज करता येणार आहेत. नोव्हेंबरअखेर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.एकूण २,६५७ जागांपैकी ७०९ एमटीएस, ७१९ क्लार्क, ९२९ ऑफिस एक्झिक्युटिव्ह आणि ३०० व्यावसायिक पदांचा समावेश आहे. या प्रशिक्षणार्थींची विविध सरकारी खाती आणि संस्थांमध्ये नियुक्ती केली जाईल. त्यात आयटीआय, पॉलिटेक्निक, नगरपालिका, पणजी महानगरपालिका, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आयडीसी, गोवा विद्यापीठ, जीटीडीसी, होमगार्ड, कदंब महामंडळ, कला अकादमी, जिल्हा पंचायत, रवींद्र भवन आणि अन्य संस्थांचा समावेश आहे.
नियुक्तीपत्रांचे २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान वाटप
संबंधित खात्यांच्या प्रमुखांना १३ नोव्हेंबरपर्यंत एनएपीएस पोर्टलवर उपलब्ध पदांची संख्या आणि अन्य माहिती अपलोड करावी लागणार आहे. उमेदवारांकडून १४ ते १७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज स्वीकारले जातील. पात्र उमेदवारांची यादी मान्यतेसाठी १८ नोव्हेंबरपर्यंत कौशल्य विकास संचालनालयाकडे पाठवावी लागणार आहे. त्यानंतर २७ ते ३० नोव्हेंबरदरम्यान विशेष कार्यक्रमांत नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाईल.
सरकारी नोकरीसाठी अनुभव ग्राह्य
अप्रेंटिस म्हणून नियुक्त झालेल्या उमेदवारांना संबंधित पदांवर कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची हमी नाही. मात्र, भविष्यात सरकारी भरती प्रक्रियेदरम्यान अप्रेंटिसशिपचा अनुभव ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना अनुभवाचा लाभ मिळू शकतो. प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन देण्यासाठी संबंधित खात्यांच्या प्रमुखांनी निधीची तरतूद करावी. तसेच त्यांच्या कामगिरीची आणि प्रगतीची नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.