पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आहे. सलग तीन दिवस कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतर बुधवारीही उकाडा कायम राहिला. मात्र, त्याचवेळी किमान तापमानात घट झाल्याने रात्रीच्या थंडीत वाढ झाली आहे. चोवीस तासांत पणजीतील किमान तापमान २.५ अंशांनी घसरून २० अंश सेल्सिअसवर आले. मुरगावमध्ये किमान तापमान २०.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
बुधवारी राज्यात कमाल तापमानाचा पारा चढाच राहिला. चोवीस तासांत दाबोळी येथे सर्वाधिक ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पणजीत ३५.२, तर मुरगावमध्ये ३५.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा जाणवत असून, रात्री मात्र तुलनेने थंड वातावरण अनुभवायला मिळत आहे.
नोव्हेंबरअखेर तापमान अधिकच राहणार
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३५ अंश, तर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच १७ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यताही हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या दिवसाचा उकाडा आणि रात्रीची थंडी असे हवामान कायम राहण्याची चिन्हे आहेत.


