या आठवड्यात प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी आहे. नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार आणि ॲमेझॉन प्राईम व्हिडिओसह विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर २३ ऑक्टोबर रोजी ‘चार यार’ ते ‘गजब रात’पर्यंत धमाकेदार मनोरंजन येत आहे.

चार यार । ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ
२००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या मुंबईतील ही कथा आहे. गरिबीला कंटाळून लक्झरी कार चोरीचा मार्ग निवडणाऱ्या चार मित्रांचा (पूरव झा, नमन जैन, साकिब अयूब आणि प्रयरक मेहता) प्रवास यात दाखवला आहे. आर्थिक अडचणींमधून बाहेर पडण्याची त्यांची धडपड त्यांना गुन्हेगार आणि एका कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्याच्या विळख्यात कशी ओढते, हे यात पाहायला मिळेल.
ल्युपिन - भाग ४ । नेटफ्लिक्स
तिसऱ्या भागातील घटनांनंतर चार वर्षांनी, अस्सेन डिओप (ओमर सी) तुरुंगात असून सेनगालमध्ये कुटुंबासोबत नव्या आयुष्याची स्वप्ने पाहत आहे. मात्र, पॅरिसमधील संग्रहालयांमध्ये चोरी करून कोणीतरी त्याला या गुन्ह्यात गोवल्यामुळे त्याचे सर्व बेत ढासळतात. आपली निर्दोषता सिद्ध करण्यासाठी आणि खऱ्या चोराचा शोध घेण्यासाठी त्याला पुन्हा तुरुंगातून पळून 'ल्युपिन'चा अवतार धारण करावा लागतो.

सुमो दीदी । झी५
भारतातील पहिली महिला व्यावसायिक सुमो कुस्तीपटू हेतल दवे हिच्या जीवनावरील हा चरित्रप्रधान क्रीडा चित्रपट असून, यात शियाम भगनानी मुख्य भूमिकेत झळकली आहे. लिंगभेद, शारीरिक शेमिंग आणि समाजातील रूढींविरुद्ध लढा देत कोलकाता ते जपानपर्यंतचा जागतिक सुमो चॅम्पियनशिपचा तिचा प्रवास यात उलगडतो.

गजब रात । नेटफ्लिक्स
दिल्लीतील एक लाचखोर पोलीस अधिकारी अजय दीक्षित (मनोज वाजपेयी) यांच्या आयुष्याभोवती ही कथा फिरते. एका चालत्या कारमधून जखमी महिलेला फेकून दिल्यानंतर सुरू झालेला तपास त्याला एका मोठ्या हत्येच्या कटात घेऊन जातो. वाढत्या संकटांसमोर अजयला बेकायदेशीर कमाई की आपले नैतिक कर्तव्य, यांपैकी एकाची निवड करावी लागते.
द लीजेंड ऑफ हनुमान - पर्व ७ । जिओ हॉटस्टार
लंकेतील युद्ध आता अंतिम टप्प्यात आले असून रावण आपले सर्वात शक्तिशाली रूप धारण करतो. रामाच्या विस्मृतीत गेलेल्या भूतकाळाचा शोध घेण्यासाठी आणि एका महाअस्त्राच्या प्राप्तीसाठी मृत्यूच्या राज्यात हनुमान कसा प्रवास करतात, याचे थरारक चित्रण या पर्वात पाहायला मिळणार आहे.

फेनडिंग ग्रँड्युर । नेटफ्लिक्स
कर्जात बुडालेला स्पॅनिश मार्किस डॉन लिएंड्रो (अँटोनिओ डी ला टोर) आपली पडकी मॅड्रिडमधील हवेली विकून स्वतःला दिवाळखोरीपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. एका श्रीमंत महिलेने हवेली खरेदी करण्याची तयारी दाखविल्यावर त्याचे नशीब बदलेल असे वाटते, मात्र या साध्या व्यवहारामागील त्या महिलेचे खरे हेतू समोर आल्यावर संपूर्ण परिस्थिती बदलते.


