‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाला रिवण-सांगे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद


2 hours ago
‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाला रिवण-सांगे येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

कार्यक्रमात लोकांचे गाऱ्हाणे ऐकताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत मंत्री सुभाष फळदेसाई व इतर. (संदीप मापारी)
...
गोवन वार्ता प्रतिनिधी
सांगे
‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’अंतर्गत रिवण-सांगे येथील ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांगे मतदारसंघातील लोकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रिवण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडाळाच्या सभागृहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, रिवणच्या सरपंच वैशाली नाईक, वाडेचे सरपंच चंदन उनंदकर व इतर सरपंच, पंच खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक विषय, ‘माझे घर’, ‘गृहआधार’, वन खाते व इतर विषयांच्या समस्या दुपारी २.३० पर्यंत सोडविण्यात आल्या.
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, सरकारने दारापर्यंत सेवा देण्याचे कार्य केले आहे. त्याचा फायदा लाभार्थ्यांनी घ्यावा. ‘सरकार तुमच्या दारी’ उपक्रमाचा फायदा ग्रामीण भागातील लोक मोठ्या संख्येने घेत असल्याचे दिसून येत आहे. या उपक्रमाद्वारे गेली अनेक वर्षे रखडलेली कामे पूर्ण होताना दिसत आहेत. ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी आधारस्तंभ बनला आहे.
रिवण येथील कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रातील कार्यकर्त्यांना भेटले. पंचायत क्षेत्रात भेडसावणाऱ्या समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले. तेथून ते वाडे कुर्डी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभागृहात पोहोचले. तेथे त्यांनी धरणग्रस्तांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. काही महिन्यांतच सर्व समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
उपक्रमाद्वारे लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न : फळदेसाई
मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले की, लोकांच्या समस्या जाणून घेऊन व त्यावर उपाय काढण्यासाठी आणि समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाद्वारे गोवाभर फिरत आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यापाठोपाठ डॉ. प्रमोद सावंत यांनी विकासकामांचा ध्यास घेतला आहे. लोकांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी एकाच जागेत सर्व अधिकाऱ्यांना एकत्र आणून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
शेवटच्या घटकाचा विकास होण्यासाठी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज आहे. विधानसभा निवडणूक जवळ आल्याने अनेकांकडून विविध आमिषे दिली जात आहेत. मात्र भूलथापांना बळी न पडता भाजप उमेदवारालाच निवडून द्या.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

हेही वाचा
सर्व पहा