पणजी : हेडलँड-सडा येथील ‘मुरगावचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेले बेकायदेशीर शेडचे बांधकाम अखेर गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ६ ऑक्टोबर रोजी पूर्णपणे पाडण्यात आले. मात्र, या कारवाईनंतर ७ ऑक्टोबर रोजी संबंधित जागेला सुरक्षित करण्यासाठी बॅरिकेडिंग लावण्यास गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना तेथे जमलेल्या जमावाने धक्काबुक्की व मारहाण करत शासकीय कामात गंभीर अडथळा निर्माण केला. या घटनेची उच्च न्यायालयाने अत्यंत गंभीर दखल घेत कारवाईत अडथळा आणणाऱ्या आणि अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या महेश मेस्ता आणि वेदांग चोडणकर या दोघांना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
मुरगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या सविस्तर अहवालानुसार, शेड पाडण्याचे काम कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ६ ऑक्टोबर रोजी पार पडले होते. परंतु, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी पालिका अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी बॅरिकेडिंग लावून जागेचा प्रत्यक्ष ताबा घेण्याच्या प्रक्रियेसाठी गेले असता, तिथे मोठा जमाव गोळा झाला. या जमावाने सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवत त्यांना कामापासून रोखण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारानंतर पालिका प्रशासनाने तातडीने स्थानिक पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात अधिकृत फिर्याद नोंदवली, तसेच या संपूर्ण घटनेची माहिती पत्राद्वारे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही कळवली.
सुरुवातीला प्रशासकीय पातळीवर या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्यात मोठी दिरंगाई दिसून आली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे अखेर ही मोठी कारवाई तडीस गेली. सध्या नगरपालिकेने यास्थळाचा पूर्ण ताबा घेण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे


