पणजी : उत्तर गोवा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रलंबित असलेल्या म्युटेशन प्रकरणांचा जलद आणि प्रभावीपणे निपटारा करण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. राज्य सरकारच्या थेट निर्देशानुसार येत्या २४ ऑक्टोबर २०२६ (शनिवार) रोजी उत्तर गोव्यातील सर्व तालुका मामलेदार कचेऱ्यांमध्ये एकाच वेळी विशेष नामंतरण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भातील अधिकृत आदेश उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी सुरेंद्र एफ. नाईक यांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केले आहेत.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत हे विशेष शिबिर सुरू राहील. सर्व मामलेदार, सह-मामलेदार आणि संबंधित कर्मचाऱ्यांना या दिवशी आपापल्या कार्यालयांमध्ये उपस्थित राहून जास्तीत जास्त प्रलंबित नामंतरण प्रकरणे त्वरित निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना वारंवार कचेऱ्यांचे फेरे मारावे लागू नयेत आणि त्यांचे अर्ज वेळेत मार्गी लागावेत, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या विशेष शिबिरांचे कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर तालुकानिहाय देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे:
अतिरिक्त जिल्हाधिकारी-१: पेडणे आणि बार्देश तालुका
अतिरिक्त जिल्हाधिकारी-२: तिसवाडी तालुका
अतिरिक्त जिल्हाधिकारी-३: सत्तरी आणि डिचोली तालुका
हे अधिकारी आपापल्या अधिकारक्षेत्रातील शिबिरांच्या कामकाजाचे थेट निरीक्षण करतील। शिबिर संपल्यानंतर सर्व मामलेदारांना हाताळलेली व निकाली काढलेली प्रकरणे तसेच उर्वरित प्रकरणांची सविस्तर आकडेवारी असलेला अनुपालन अहवाल (Compliance Report) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.


