खातेदाराच्या सावधगिरीमुळे सायबर चोराचा फसला डाव

फोंडा येथील एका पत्रकाराला भामट्यांनी घरगुती वापराच्या गॅसचे बिल ऑनलाईन भरण्यासाठी फोन करून नवीन अॅप घेण्यासाठी १३ रुपये पाठविण्याची विनंती केली. पण पत्रकाराच्या हुशारीमुळे त्याच्या बँक खात्यातील ५ लाख ४६ हजार ५०० रुपये हडप होण्यापासून वाचले.

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
खातेदाराच्या सावधगिरीमुळे सायबर चोराचा फसला डाव

फोंडा : गोव्यात सध्या सायबर गुन्ह्यांत भरमसाट वाढ झाली आहे. तरीसुद्धा अनेक मोबाईलधारक गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडताना दिसून येत आहेत. फोंडा येथील एका पत्रकाराला भामट्यांनी घरगुती वापराच्या गॅसचे बिल ऑनलाईन भरण्यासाठी फोन करून नवीन अॅप घेण्यासाठी १३ रुपये पाठविण्याची विनंती केली. पण पत्रकाराच्या हुशारीमुळे त्याच्या बँक खात्यातील ५ लाख ४६ हजार ५०० रुपये हडप होण्यापासून वाचले.
फोंडा येथे राहणाऱ्या पत्रकाराला दि. १४ ऑक्टोबर रोजी अज्ञात व्यक्तीचा फोन आला. गॅस पाईपलाईनचे बिल मोबाईल अॅपमधून भरण्यासाठी फक्त १३ रुपये भरा आणी अॅप घ्या, अशी विनंती करण्यात आली. सदर पत्रकाराचे कुटुंबीय गॅसचे बिल कार्यलयात जाऊन भरतात. अॅपमुळे घरी बसून बिल भरता येईल म्हणून त्याने अॅपसाठी १३ रुपये भरण्याचा प्रयत्न केला. पत्रकाराने दोन-तीन वेळा प्रयत्न केला, तरीही १३ रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे त्याने गप्प राहणे पसंत केले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने पुन्हा फोन करून अॅप घेण्यासाठी १३ रुपये जमा झाले नसल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी बँकेच्या अकाऊंटची माहिती मागितली. पत्रकारानेही गडबडीत बँक खात्याची माहिती देण्यात सुरुवात केली. मात्र त्याला संशय आला. त्यामुळे त्याने अर्धवट माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी पत्रकाराच्या बँक खात्यातून तीन वेळा रक्कम काढल्याचा संदेश आला. पहिल्यांदा २,५०,०००, दुसऱ्यावेळी १,९९,००० व तिसऱ्या वेळी ९७, ५०० रुपये काढल्याचे संदेश पाहून पत्रकाराला घाम सुटला. त्याने त्वरित बँकेच्या शाखेत जाऊन तपासणी केली. त्यावेळी सदर रक्कम कायम ठेवीतून अज्ञात व्यक्ती काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजल्यावर बँक अधिकाऱ्याने पत्रकाराचे खाते तात्पुरते बंद केले.

पोलिसांचे खबरदारीचे आवाहन

पत्रकाराने दिलेल्या माहितीनसार, बँक खात्याच्या शाखेत अज्ञात व्यक्तीने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला खरा, पण रक्कम कायम ठेवीतून काढण्याचा प्रयत्न केल्याने तो फसला. अन्यथा बँक खात्यातील रक्कम गायब झाली असती. गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्ह्यांत वेगवेगळ्या पद्धतीने फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. मोबाईलवर आलेले संदेश किंवा अज्ञात व्यक्तीचे फोन आल्यावर बँक खात्यातील माहिती देऊ नये, असे आवाहन फोंडा पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा