एका वर्षात कदंब महामंडळाच्या उत्पन्नात १५ टक्क्यांची वाढ

पाच वर्षांतील सर्वाधिक नफा : उत्पन्न २९०.६३ कोटींवरून ३३३ कोटींवर

Story: गोवन वार्ता प्रतिनिधी |
20th October, 11:30 pm
एका वर्षात कदंब महामंडळाच्या उत्पन्नात १५ टक्क्यांची वाढ

पणजी : राज्यात दळणवळणासाठी विश्वासू पर्याय समजल्या जाणाऱ्या कदंब महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये महामंडळाचे उत्पन्न १४.८० टक्क्यांनी वाढले आहे. २०२४-२५ मध्ये कदंबचे एकूण उत्पन्न २९०.६३ कोटी रुपये होते. २०२५- २६ मध्ये ते वाढून ३३३ कोटी रुपये झाले. एका वर्षात महामंडळाला १७.३० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हा मागील पाच आर्थिक वर्षातील सर्वाधिक नफा ठरला आहे.

महामंडळाच्या मागील पाच आर्थिक वर्षांतील वित्तीय आकडेवारीवरून एकूण उत्पन्नासह खर्चात सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाच वर्षांत सुरुवातीच्या कालावधीत कदंबचा खर्च वेगाने वाढला होता. अलीकडच्या काही आर्थिक वर्षात खर्च वाढीच्या तुलनेत उत्पन्न निर्मिती देखील अधिक वेगाने झाली आहे. यामुळे निव्वळ नफ्याचे प्रमाण वाढत आहे.

यामध्ये प्रामुख्याने दुय्यम उत्पन्न स्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाचा वाटा अधिक आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये कदंबला बस सेवेद्वारे ४८.९० कोटी तर अन्य पद्धतीने १४६ कोटी असे एकूण १९४.९० कोटी उत्पन्न मिळाले होते. त्यावर्षी कदंबला एकूण १६६.५० कोटी रुपये खर्च झाला. आर्थिक वर्ष २०२२- २३ मध्ये कदंबला बस सेवेद्वारे ७९.१६ कोटी तर अन्य पद्धतीने १६६.५० कोटी असे एकूण २४५.६६ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यावर्षी कदंबला एकूण २३९ कोटी रुपये खर्च झाला.

आर्थिक वर्ष २०२४- २५ मध्ये कदंबला बस सेवेद्वारे ९५.३३ कोटी तर अन्य पद्धतीने १९५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यावर्षी कदंबला एकूण २८६.३६ कोटी रुपये खर्च झाला. आर्थिक वर्ष २०२५- २६ मध्ये कदंबला बस सेवेद्वारे १०६.९८ कोटी तर अन्य पद्धतीने २२६ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यावर्षी कदंबला एकूण ३१५.७० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे.


हेही वाचा
सर्व पहा