पणजी : २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुरगाव बंदरावर ४४ क्रूझ जहाजांमधून एकूण ७४,७६६ पर्यटक गोव्यात दाखल झाले. यामध्ये ३२ देशांतर्गत क्रूझ जहाजांमधून आलेल्या ६२,५७० प्रवाशांचा, तर १२ आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजांमधून आलेल्या १२,१९६ प्रवाशांचा समावेश आहे. गोव्यातील क्रूझ पर्यटनाला चालना देण्यासाठी मुरगाव बंदर प्राधिकरणाने १२२.७२ कोटी रुपये खर्चाचा क्रूझ टर्मिनल आणि फेरी सुविधांचा प्रकल्प हाती घेतला आहे.
मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सध्या क्रूझ जहाजे हाताळल्या जाणाऱ्या ब्रेकवॉटर बर्थजवळील १३.४ एकर जागेत हा प्रकल्प उभारला जात आहे. केंद्र सरकारने देशातील पाच प्रमुख बंदरांचा क्रूझ पर्यटन केंद्रे म्हणून विकास करण्याचे ठरवले असून, त्यात मुरगाव बंदराचाही समावेश आहे.
३,२५६ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या व्यापारी इमारतीत क्रूझ प्रवाशांसाठी विशेष खरेदी विभाग असेल. ही जागा सर्वसामान्य नागरिकांसाठीही खुली असेल. दोन्ही क्रूझ टर्मिनल इमारतींचे एकूण क्षेत्रफळ ९,८७२ चौरस मीटर असेल. रो-पॅक्स आणि फेरी सेवांमुळे उत्तर गोव्यासह अन्य पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होण्याची अपेक्षा आहे.
प्रकल्पाच्या एकूण १२२.७२ कोटी रुपयांच्या खर्चापैकी १०१.७२ कोटी रुपये अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकामासाठी, तर २१ कोटी रुपये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) घटकासाठी राखीव आहेत. या घटकात ३० वर्षांच्या संचालन आणि देखभालीचा समावेश आहे. सागरमाला योजनेअंतर्गत बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने, तसेच पर्यटन मंत्रालयाने प्रत्येकी ५० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
कोचीन बंदर प्राधिकरणाची या प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पाचे काम सुरू असून, ३१ डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमध्ये आधुनिक सुविधा
प्रकल्पात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल, फेरी व रो-पॅक्स सुविधा, पार्किंग, अंतर्गत रस्ते, व्यापारी जागा आणि सुशोभीकरणाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टर्मिनलमध्ये २४ इमिग्रेशन काउंटर्स, १० तपासणी काउंटर्स, प्रवाशांसाठी प्रतीक्षा दालने आणि सामान हाताळणीची सुविधा असेल. याशिवाय ड्यूटी-फ्री दुकाने, लाउंज आणि फूड कोर्टही उभारण्यात येणार आहेत.


