बलाढ्य यूपीला गोव्याने २०२ धावांत गुंडाळले

यश कसवणकरचे ८६ धावांत ५ बळी

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
18th October, 11:57 pm
बलाढ्य यूपीला गोव्याने २०२ धावांत गुंडाळले

पणजी : अष्टपैलू यश कसवणकर याने आपली निवड सार्थ ठरवताना उत्तर प्रदेशविरुद्ध रविवारपासून कानपूर येथील ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू झालेल्या रणजी ट्रॉफी एलिट स्पर्धेतील सामन्यात पहिल्याच डावात ८६ धावांत ५ गडी बाद करत यजमान संघाचे कंबरडे मोडले. यशच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर गोवा संघाने बलाढ्य उत्तर प्रदेशचा पहिला डाव केवळ २०२ धावांत संपवला. रिंकू सिंग याने उत्तर प्रदेशकडून एकाकी झुंज देताना १८६ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह नाबाद ११८ धावा केल्या. गोव्याने दिवसअखेर १२ षटकांच्या खेळात बिनबाद ४३ धावा करत पहिला दिवस आपल्या नावे केला. दिवसअखेर सुयश प्रभुदेसाई १२ व शिवेंद्र भुजबळ ३१ धावांवर नाबाद होते. गोव्याचा संघ अजून १५९ धावांनी पिछाडीवर असून दुसऱ्या दिवशी शानदार खेळ करून मोठी आघाडी घेण्याचा गोव्याचा प्रयत्न असेल.
नाणेफेक जिंकून यूपीने प्रथम फलंदाजी स्वीकारली. जलदगती गोलंदाज रुत्विक नाईकने अभिषेक गोस्वामी व आर्यन जुयल यांना बाद करत यूपीची २ बाद ३१ अशी स्थिती केली. यातच यश कसवणकरने करण शर्मा याला शून्यावर धावबाद करताना त्यांना ३ बाद ३३ असे अडचणीत आणले. माधव कौशिक (४५) व रिंकू यांनी ५९ धावांची भागीदारी केली. शुभम तारी याने ही धोकादायक ठरत असलेली जोडी फोडली. यानंतर यश कसवणकरने आपल्या गोलंदाजीने यूपीच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. यूपीची ९ बाद १३७ अशी केविलवाणी स्थिती झाली होती. रिंकूने या स्थितीतून संघाला दोनशेपार नेले.
गोव्याने या सामन्यासाठी संघात दोन बदल करताना पहिल्या सामन्यातील मोहित रेडकर व दीपराज गावकर यांना डच्चू देताना त्यांच्या जागी यश कसवणकर व अमूल्य पांड्रेकर यांना संघात घेतले.
संक्षिप्त धावफलक
उत्तर प्रदेश, पहिला डाव : अभिषेक गोस्वामी झे. अभिनव तेजराणा गो. रुत्विक नाईक ५, माधव कौशिक झे. शिवेंद्र भुजबळ गो. शुभम तारी ४५, आर्यन जुयल पायचीत गो. रुत्विक नाईक १४, करण शर्मा धावबाद यश कसवणकर ०, रिंकू सिंग नाबाद ११८, आराध्य यादव त्रि. गो. यश कसवणकर १, झीशान अन्सारी झे. रुत्विक नाईक गो. यश कसवणकर २, कार्तिक यादव झे. व गो. यश कसवणकर ६, कार्तिक त्यागी झे. व गो. ललित यादव ५, यश दयाल झे. दर्शन मिसाळ गो. यश कसवणकर ०, वंश त्रि. गो. यश कसवणकर ४, अवांतर २, एकूण ७१.० षटकांत सर्वबाद २०२.
गोलंदाजी : वासुकी कौशिक ९-१-२४-०, रुत्विक नाईक १४-२-३७-२, शुभम तारी १३-१-३३-१, यश कसवणकर २५-१-८६-५, ललित यादव ८-२-१८-१, अमूल्य पांड्रेकर २-०-३-०.
गोवा, पहिला डाव : सुयश प्रभुदेसाई नाबाद १२, शिवेंद्र भुजबळ नाबाद ३१, अवांतर ०.
गोलंदाजी : यश दयाल ३-१-६-०, कार्तिक यादव ४-१-१२-०, कार्तिक त्यागी ३-०-२२-०, वंश २-०-३-०.