कोल्हापूरचा मल्ल विश्वजित मोरेची ऐतिहासिक कामगिरी

२३ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पटकावले रौप्यपदक

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
15th October, 11:01 pm
कोल्हापूरचा मल्ल विश्वजित मोरेची ऐतिहासिक कामगिरी

न्यूयॉर्क : भारताचा युवा कुस्तीपटू विश्वजित रामचंद्र मोरे याने अमेरिकेत सुरू असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पराक्रम करत देशाच्या नावावर रौप्यपदक कोरले आहे. पुरुषांच्या ५५ किलो ग्रीको-रोमन वजनी गटाच्या अंतिम फेरीत विश्वजितला जॉर्जियाच्या कोबा कारुमिद्झेविरुद्ध १२-१३ अशा अत्यंत निसटत्या आणि चुरशीच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला, मात्र या संघर्षाने कोट्यवधी भारतीय क्रीडाप्रेमींची मने जिंकली.
अंतिम फेरी गाठणारा आणि या मानाच्या स्पर्धेत ग्रीको-रोमन प्रकारात रौप्यपदक जिंकणारा विश्वजित हा भारताचा पहिलाच कुस्तीपटू ठरला असून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा इतिहास रचला आहे.
सुवर्णपदक जिंकण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचलेल्या विश्वजितने संपूर्ण सामन्यात जबरदस्त आक्रमक डावपेच रचत आघाडी घेतली होती. मात्र, लढतीच्या शेवटच्या काही सेकंदांमध्ये जॉर्जियाच्या कोबा कारुमिद्झेने अत्यंत वेगवान हालचाली करत निर्णायक गुण वसूल केले आणि सामना १२-१३ असा आपल्या बाजूने झुकवला. अवघ्या एका गुणाने सुवर्णपदक हुकले असले, तरी ग्रीको-रोमनसारख्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक प्रकारात विश्वजितने भारताचा झेंडा रोवला आहे.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यापूर्वी विश्वजितने आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पहिल्या फेरीत त्याने मेक्सिकोच्या आयझॅक मारिनचा १०-८ असा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्याने २० वर्षाखालील गटाचा विद्यमान जागतिक विजेता असलेल्या इराणच्या आर्मिन शम्सीपूरचा ८-१ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात त्याने मारलेला अप्रतिम चार गुणांचा ‘थ्रो’ विशेष चर्चेत राहिला. यानंतर उपांत्य फेरीत रशियाच्या मलिक गिगिएव्हचा ७-४ असा पराभव करत त्याने थेट अंतिम फेरीत दणक्यात धडक मारली होती. यापूर्वी विश्वजितने याच स्पर्धेत भारताला दोन वेळा कांस्यपदक मिळवून दिले होते. यंदा आपल्या खेळात आणखी सुधारणा करत त्याने ऐतिहासिक रौप्यपदकाची कमाई केली आहे.
इतर भारतीय खेळाडूंची स्थिती
महिला गटात भारताच्या कोमलला उपांत्य फेरीत युक्रेनच्या अलिना फिलिपोविचकडून तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारे पराभव पत्करावा लागल्याने तिचे आव्हान आता कांस्यपदकाच्या लढतीत कायम आहे. याशिवाय, ६८ किलो वजनी गटात दीक्षा मलिक हिच्याकडूनही कांस्यपदकाच्या आशा टिकून आहेत. मानसी लाठरला इटलीच्या लॉरा गोडिनोकडून ९-१० अशा निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने ती स्पर्धेतून बाहेर पडली आहे, तर पुरुषांच्या ग्रीको-रोमन गटात चेतन आणि करण कंबोज यांचे आव्हान आधीच संपुष्टात आले होते.