म्हापसा : मालिम-बेती येथे १० रुपयांच्या मटका लावण्याच्या वादातून मटका बुकीने एका दुकानदारावर पेपर कटरने हल्ला केला. या हल्ल्यात मोहम्मद हजरत (रा. मूळ उत्तर प्रदेश) हा जखमी झाला. साळगाव पोलिसांनी संशयित रझाऊल शेख (रा. मूळ राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी, १५ ऑक्टोबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास मालिम-बेती जेटीजवळ ही घटना घडली. संशयित रझाऊल शेख हा बेती परिसरात फेरफटका मारत मटका घेत असल्याचे सांगण्यात आले. घटनेच्या वेळी संशयित हजरत यांच्या केशकर्तनालयाजवळ आला होता. दहा रुपयांचा मटका लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. शिवीगाळ झाल्यानंतर हजरत दुकानात गेले असता, संशयिताने त्यांच्या मागोमाग दुकानात प्रवेश करून पेपर कटरने हल्ला केला.
कटरचा वार हाताला लागल्याने हजरत जखमी झाले. त्यांनी बेती पोलीस चौकीत जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी त्यांना रुग्णवाहिकेतून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, गोवा जुगार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


