मडगाव: कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलावर चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत असोळणा येथील रहिवासी संशयित आगुस्तिन परेरा याला अटक केली आहे.
सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२६ या दोन महिन्यांच्या कालावधीत कुंकळ्ळी परिसरामध्ये हा प्रकार घडत असल्याचे तक्रारीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. पीडित अल्पवयीन मुलाच्या पालकांच्या वतीने या गंभीर घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. तक्रार प्राप्त होताच कुंकळ्ळी पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गोवा बाल संरक्षण कायदा आणि पोक्सो (POCSO) कायद्यातील विविध कलमांनुसार संशयित आगुस्तिन परेरा याच्यावर गुन्हा नोंदवला आणि त्याला तातडीने ताब्यात घेतले व चौकशीअंती त्यास अटक करण्यात आली.
कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदन भोसले या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


