वाळपई : सत्तरी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून विविध गावांमध्ये तांब्याच्या भांड्यांची चोरी होत असल्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. अखेर पर्ये-सत्तरी येथे शुक्रवारी मध्यरात्री तांब्याची भांडी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना स्थानिकांनी पकडून वाळपई पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणात कमलेश गुरव (वय २२), पवन संजय नायक (वय २८) आणि विजय तुकाराम भोसले (वय २६, सर्व रा. साखळी कारापूर तिस्क) या तिघांना अटक केली. वाळपई प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सत्तरी तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून अनेक गावांमध्ये तांब्याची भांडी चोरीला जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. धावे, नगरगाव, ठाणे, सुर्ला, झर्मे, दाबे, सालेली, गुळेली आदी भागांमध्ये अशाप्रकारच्या घटना घडल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
पर्ये येथे चोरीचा प्रयत्न
शुक्रवारी मध्यरात्री पर्ये-सत्तरी येथील काही घरांमधून तांब्याची भांडी चोरण्याचा प्रयत्न सुरू असताना स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळाली. नागरिकांनी तत्काळ सतर्कता दाखवत तिघांना पकडून ठेवले आणि याबाबत वाळपई पोलिसांना कळविले. माहिती मिळताच वाळपई पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि त्यांची चौकशी सुरू केली.
दरम्यान, घटनास्थळी संतप्त झालेल्या काही नागरिकांनी संशयितांना मारहाण केल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणात चोरीसाठी जी. ए. ०४ ई ५७४८ या क्रमांकाची मारुती इको व्हॅन वापरल्याचे समोर आले आहे.

भंगार अड्ड्यावर जात मुद्देमाल जप्त
तांब्याची भांडी चोरल्यानंतर ती कारापूर-साखळी परिसरातील भंगार अड्ड्यावर नेऊन वितळवून त्यांची विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित भंगार अड्ड्यावर जाऊन तपासणी केली आणि तेथून मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मिळाली आहे.
दोन दिवसांची पोलीस कोठडी
पर्ये येथे पकडण्यात आलेल्या कमलेश गुरव, पवन संजय नायक आणि विजय तुकाराम भोसले या तिघांना वाळपई पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत त्यांच्याकडून अधिक माहिती मिळविणे, चोरीच्या घटनांची पडताळणी करण्यात येणार आहे.


