अजित शंखवाळकर उपनिरीक्षक बनून फिरायचा

अनेक वर्षे उपनिरीक्षक असल्याचे भासवून पोलिसांचाच अर्धा पेहराव करून फिरणाऱ्या आणि पोलीस खात्यातील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत अनेकांसोबत नेहमी उठबस करणाऱ्या अजित शंखवाळकरने एक दोन नव्हे तर अनेकांना टोपी घातल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्याच्या जाळ्यात फसलेल्या एकाच कुटुंबातील भाऊ बहिणीला नोकरीची बोगस नियुक्ती पत्रे देऊन थेट खोटे अबकारी आयुक्त बनवणारा हा महाभाग गेली अनेक वर्षे आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचेच लोकांना सांगात होता.


09th October, 11:51 pm
अजित शंखवाळकर उपनिरीक्षक बनून फिरायचा

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
अनेक वर्षे उपनिरीक्षक असल्याचे भासवून पोलिसांचाच अर्धा पेहराव करून फिरणाऱ्या आणि पोलीस खात्यातील वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत अनेकांसोबत नेहमी उठबस करणाऱ्या अजित शंखवाळकरने एक दोन नव्हे तर अनेकांना टोपी घातल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्याच्या जाळ्यात फसलेल्या एकाच कुटुंबातील भाऊ बहिणीला नोकरीची बोगस नियुक्ती पत्रे देऊन थेट खोटे अबकारी आयुक्त बनवणारा हा महाभाग गेली अनेक वर्षे आपण पोलीस उपनिरीक्षक असल्याचेच लोकांना सांगात होता. खाकी पँट आणि पोलिसांचे बूट हे तर तो नेहमीच वापरायचा; पण कधी कधी पोलीस उपनिरीक्षकाचा गणवेशही घालून फिरायचा.
काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्याचे चांगले संबंध होते. अनेक पोलीस कर्मचारी त्याच्या जाळ्यात फसले आहेत. अनेकांना वेगवेगळी आमिषे दाखवणाऱ्या या ठगाने कोमुनिदादचे प्लॉट देतो असे सांगूनही लोकांकडून पैसे उकळले आहेत. पाच दहा लाखांचा हिशोबच नाही. लोकांकडून पंचवीस पंचवीस लाख रुपये घेऊन त्याने फसवणूक केली. लोकही या भामट्याच्या पोलीस उपनिरीक्षक असल्याच्या बनावाला बळी पडले. आता एक-एक प्रकरण समोर येत आहे आणि हा पणजीतला भामटा मात्र फरार आहे.
सरकारी नोकरीचे गाजर दाखवून बहीण, भावाला ५२ लाखांना चुना !
सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे लाटण्याच्या प्रकरणात नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. बनावट अबकारी आयुक्त प्रकरणातील मुख्य संशयित अजित शंखवाळकर याच्याविरोधात पणजी पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. बहीण आणि भावाला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून संशयित शंखवाळकरने तब्बल ५२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सध्या संशयित शंखवाळकर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पणजी येथील उत्पादन शुल्क मुख्यालयात गुरुवारी मनोज तळेकर नावाची व्यक्ती स्वतःला नवीन आयुक्त असल्याचे सांगून आयुक्तांच्या दालनात घुसली होती. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासात धक्कादायक बाब समोर आली. तोतया अधिकारी बनून आलेल्या मनोज तळेकरला संशयित अजित शंखवाळकरने शासकीय नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून २७ लाख रुपये उकळले होते. त्याला आयुक्तपदाचे बनावट आदेशपत्र देऊन अबकारी मुख्यालयात पाठवले होते. मनोजच्या बहिणीकडूनही २५ लाख रुपये उकळून तिला पीडब्ल्यूडी खात्यात अकाऊंटंट पदाचे बनावट नियुक्ती पत्र शंखवाळकरने दिले होते. दरम्यान, तळेकर कुटुंबियांना कोमुनिदादीतील जमीन देण्याच्या बहाण्याने त्याने ८० लाख रुपये घेतले होते. त्यासाठी शंखवाळकर याने स्वतः मालक असल्याचे भासवून विक्री करार केला होता.
तक्रार अन् पोलिसांची कारवाई
तत्कालीन आयुक्त यांची बदली झाल्याने हे पद रिक्त असल्याचा गैरफायदा शंखवाळकरने घेतला. मनोज तळेकरला बनावट नियुक्तीपत्र दिले. या प्रकरणी उत्पादन शुल्क खात्याचे साहाय्यक आयुक्त संकेत साखरदांडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी अजित शंखवाळकर याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस फरार शंखवाळकरचा शोध घेत आहेत.
८ ऑक्टोबरपासून फरार
संशयित अजित शंखवाळकर ८ ऑक्टोबरपासून फरार आहे. त्यापूर्वी त्याने पत्नीकडून ५ हजार रुपये, तर दुकान भाडेकरूकडून २० हजार रुपये घेतले आहेत. पोलिसांनी त्याचे बँक खाते गोठविले असून त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.      

हेही वाचा
सर्व पहा