पीडब्ल्यूडीत अकाऊंटंटचे बनावट नियुक्तीपत्र देऊन २५ लाखांचा गंडा; संशयित शंखवाळकर फरार

बनावट अबकारी आयुक्त प्रकरणी संशयित अजित शंखवाळकर याच्यावर एकाच कुटुंबातील अन्य सदस्याला पीडब्ल्यूडीत अकाऊंटंटच्या नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
पीडब्ल्यूडीत अकाऊंटंटचे बनावट नियुक्तीपत्र देऊन २५ लाखांचा गंडा; संशयित शंखवाळकर फरार

पणजी : गोव्यातील प्रशासकीय यंत्रणेला हादरवून सोडणाऱ्या नोकरी घोटाळा प्रकरणात नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. बनावट अबकारी आयुक्त प्रकरणातील मुख्य संशयित अजित शंखवाळकर याच्या विरोधात पणजी पोलिसांनी आणखी एक नवीन गुन्हा दाखल केला आहे. एकाच कुटुंबातील अन्य सदस्याला पीडब्ल्यूडी खात्यात लेखापाल (अकाऊंटंट) पदाचे बनावट नियुक्ती पत्र देऊन त्याने तब्बल २५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पणजी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सध्या संशयित शंखवाळकर फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, कालच पणजी येथील उत्पादन शुल्क मुख्यालयात घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. एक व्यक्ती स्वतः आयएएस असल्याचे भासवून स्वतःला नवीन आयुक्त सांगत थेट आयुक्तांच्या दालनात घुसला आणि कर्मचाऱ्यांवर हुकूम सोडू लागला. मात्र, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना बोलावून त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासात धक्कादायक बाब समोर आली की, हा तोतया अधिकारी स्वतःच या घोटाळ्याचा बळी ठरला होता. संशयित अजित शंखवाळकर याने त्याला शासकीय नोकरीचे आमिष दाखवून त्याच्याकडून तब्बल २७ लाख रुपये उकळले होते आणि त्याला आयुक्त पदाचे बनावट आदेशपत्र देऊन मुख्यालयात पाठवले होते.

उत्पादन शुल्क विभागाकडून तक्रार अन् पोलिसांची कारवाई

तत्कालीन आयुक्त यांची बदली झाल्याने हे पद रिक्त असल्याचा गैरफायदा शंखवाळकर घेतला आणि सदर व्यक्तीला बनावट नियुक्तीपत्र दिले. या प्रकरणी उत्पादन शुल्क खात्याचे साहाय्यक आयुक्त संकेत साखरदांडे यांनी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी अजित शंखवाळकर याच्यावर गुन्हा दाखल केला. सध्या पणजी पोलीस फरार शंखवाळकरच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा