वास्को : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बसचालकांविराेधात कठोर कारवाई करण्याचा इशारा वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिला आहे. वास्को-बोगमाळो मार्गावर बंद असलेली कदंब महामंडळाची दुसरी बस ९ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांची वाढती गरज लक्षात घेऊन तिसरी बसही लवकरच सुरू करण्याचे निर्देश गुदिन्हो यांनी दिले आहेत.
वास्को-बोगमाळो मार्गावरील बससेवेची उपलब्धता, फेऱ्यांची वारंवारता आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी चिकलोणा-बोगमाळो ग्रामपंचायत कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली. या बैठकीला सरपंच, पंचसदस्य, कदंब वाहतूक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, वाहतूक पोलीस, खासगी बसचालक आणि बाधित प्रवासी उपस्थित होते.
बैठकीत स्थानिक नागरिक व प्रवाशांनी बससेवेतील अनियमितता, अपुऱ्या फेऱ्या आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या गैरसोयींबाबत आपल्या समस्या मांडल्या. प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत गुदिन्हो यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. दुसरी कदंब बस ९ ऑक्टोबरपासून पुन्हा सेवेत दाखल होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच तिसरी कदंब बस लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यासही त्यांनी सांगितले.
खासगी बसचालकांनी निर्धारित नियमांचे पालन करून नियमित आणि विश्वासार्ह सेवा देणे आवश्यक असल्याचे गुदिन्हो यांनी स्पष्ट केले. नियमांचे उल्लंघन करून प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या बसचालकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, खासगी बसचालकांनी आपल्या व्यवसायासंबंधीच्या अडचणी मांडताना ‘माझी बस’ योजनेत सहभागी होण्यासाठी मदतीची मागणी केली. या विषयावर संबंधित विभागांशी चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन गुदिन्हो यांनी दिले.
बोगमाळोतील नागरिकांना मूलभूत बससेवेसाठी संघर्ष करावा लागू नये. नागरिकांच्या रास्त अडचणी ऐकून त्यावर उपाय शोधणे ही आपली जबाबदारी आहे. बैठकीत मांडलेल्या समस्यांवर प्रत्यक्ष कार्यवाही होईपर्यंत संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही गुदिन्हो यांनी दिली. वास्को-बोगमाळो मार्गावरील परिस्थितीवर लक्ष ठेवून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कदंब महामंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.


