विनापरवाना कॅटरर्स, पार्टी हॉलनी तीन आठवड्यात परवाने घ्यावेत : एफडीए

अन्यथा कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) राज्यभरातील विनापरवाना कॅटरर्स आणि नोंदणी नसलेल्या पार्टी हॉल्सवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांनी याबाबत नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल असा इशारा देण्यात आला आहे. सर्व विनापरवाना कॅटरर्स आणि पार्टी हॉल चालकांना पुढील तीन आठवड्यांच्या आत एफएसएसएआय परवाना मिळवण्यासाठी तातडीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
08th October, 02:52 pm
विनापरवाना कॅटरर्स, पार्टी हॉलनी तीन आठवड्यात परवाने घ्यावेत : एफडीए

पणजी : अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) राज्यभरातील विनापरवाना कॅटरर्स आणि नोंदणी नसलेल्या पार्टी हॉल्सवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांनी याबाबत नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई आणि दहा लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल असा इशारा देण्यात आला आहे. सर्व विनापरवाना कॅटरर्स आणि पार्टी हॉल चालकांना पुढील तीन आठवड्यांच्या आत एफएसएसएआय परवाना मिळवण्यासाठी तातडीने अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रशासनाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, परवाने, नोंदणी नसलेल्या व्यवसायिकांनी foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून अथवा बांबोळी येथील एफडीए मदत केंद्राची मदत घेऊन यासाठी अर्ज करू शकतात. समारंभ, उत्सव, धार्मिक विधी किंवा संस्थांमध्ये १० ते २५ किंवा त्याहून अधिक लोकांच्या समूहासाठी अन्न तयार करणे, साठवणे, वाढणे किंवा वाहतूक करणे या कामात गुंतलेल्या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला 'कॅटरर' म्हणून परिभाषित करण्यात आले आहे. नियमांनुसार कॅटरर्सना विविध गोष्टींचे पालन करणे बंधनकारक आहे.

यामध्ये  एफएसएसएआय परवाना मिळवणे, स्वच्छता नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, अन्न हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यास वैध स्वच्छता कार्ड देणे आवश्यक आहे. हे नियम सर्व बँक्वेट हॉल्स, खाजगी हॉल्स आणि अन्न शिजवण्याची किंवा वाढण्याची सोय असलेल्या धार्मिक स्थळांशी संलग्न असलेल्या हॉल्सना लागू होतात.

पार्टी हॉल चालकांसाठी हॉलच्या आवारात एफएसएसएआय  परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र नेहमी प्रदर्शित करणे, कचरा व्यवस्थापनाची योग्य सोय, पिण्याचे पाणी आणि स्वयंपाकघरासाठी कायमस्वरूपी पक्की रचना उपलब्ध करून देणे, स्वच्छतेचे नियम पाळणे यांचा समावेश आहे.

विनापरवाना व्यवसाय  करणाऱ्यांवर होणार कारवाई

एफडीएने घरातून, वाहनांतून किंवा सोशल मीडियाद्वारे विनापरवाना अन्न व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अशा विक्रेत्यांनी आवश्यक ते सर्व परवाने घेणे, नोंदणी करणे, स्वच्छतेचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा