एसीबीने छापा टाकलेला बेतकेकरवाडा-नाणूस येथील गौरीश नाईक याचा बंगला.
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी निलंबित पोलीस काॅन्स्टेबल गौरीश नाईक याच्या नाणूस - बेतकेकरवाडा येथील घरावर आणि सासूरवाडी पार्से-पेडणे येथे छापा टाकला होता. एसीबीने त्याच्याकडून ८०० ग्रॅम सोने, ५० लाख रुपयांची कायम ठेव, तीन भूखंडांचे दस्तऐवज व इतर जप्त केले आहे. या मालमत्तांची किमत ७ ते ८ कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज एसीबीने व्यक्त केला आहे. दरम्यान गौरीश नाईक याच्यासह त्याचे वडील आणि पत्नी यांना म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने ३० हजार रुपये व इतर अटींवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
निलंबित पोलीस काँन्स्टेबल (चालक) गौरीश नाईक हा वाळपई पोलीस स्थानकावर कार्यरत असताना त्याच्या कामकाजाबाबत विविध तक्रारी आणि आरोप करण्यात आले होते. याच दरम्यान हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी १ सप्टेंबर रोजी झालेल्या विधानसभा अधिवेशनात काही पोलिसांचे गैरवर्तन, भ्रष्टाचार व वरकमाईचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी फेरेरा यांनी पोलीस कॉन्स्टेबल गौरीश नाईक याच्या उत्पन्नाच्या तुलनेत बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोप केला होता. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नाईक याला निलंबित करण्यात आले. त्याच्याविरोधातील आणखी एका तक्रारीची दखल घेऊन भ्रष्टाचारविरोधी पथकाने (एसीबी) चौकशी सुरू केली. १९ नोव्हेंबर रोजी एसीबीचे अधीक्षक राजन निगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अपर्णा चोपडेकर यांनी गौरीश नाईक याच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. २० रोजी सकाळी ८ वाजल्यापासून त्याच्या नाणूस-बेतकेकरवाडा येथील घरावर छापा टाकण्यात आला. त्याच्या पार्से-पेडणे येथील सासूरवाडीच्या घरावरही छापा टाकण्यात आला. सदर कारवाई २१ रोजी सकाळी ६ वाजता पूर्ण झाली. त्यात एसीबीने त्याच्याकडून ८०० ग्रॅम सोने, ५० लाख रुपयांची कायम ठेव, तीन भूखंडांचे दस्तऐवज व इतर जप्त केले. या मालमत्तांची किमत ७ ते ८ कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज एसीबीने व्यक्त केला आहे. याशिवाय त्याचे बँक लॉकर सील केले आहेत. एसीबीने पुढील चौकशीसाठी गौरीश नाईकला एसीबीच्या कार्यालयात पाचारण केले होते. याच दरम्यान शनिवारी त्याची तब्येत बिघडल्याने तो इस्पितळात दाखल झाला. तिथे त्याच्यावर उपचार करून त्याला दोन दिवसांचा आराम करण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला.
नाईक कुटुंबियांची अटकपूर्व जामिनासाठी धाव
याच दरम्यान निलंबित गौरीश नाईक याच्यासह त्याची पत्नी आणि वडिलांनी मेरशी येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. म्हापसा येथील अतिरिक्त न्यायालयात त्यावर सुनावणी झाली. या प्रकरणी अॅड. राजू उर्फ कमलाकांत पोवळेकर यांनी न्यायालयात त्यांची बाजू मांडली. याची दखल घेऊन न्यायालयाने गौरीश नाईकसह त्याची पत्नी आणि वडिलांना प्रत्येकी ३० हजार रुपये, सात दिवस एसीबीत सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान हजेरी लावणे व इतर अटींवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ रोजी होणार आहे. याबाबतचा आदेश न्या. द्विज्पल पाटकर यांनी दिला.


