आरजी हे माझे अपत्य, मी या पक्षाचा बाप असल्याचे अभिमानाने सांगतो : मनोज

पर्वरीतील सभेत मनोज परब यांनी पुन्हा आरजीत प्रवेश करत आमदार वीरेश बोरकर यांच्यावर टीका केली; तर गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ते पुन्हा आल्याचे अजय खोलकर यांनी सांगितले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
आरजी हे माझे अपत्य, मी या पक्षाचा बाप असल्याचे अभिमानाने सांगतो : मनोज

पणजी : रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी (आरजी) हे माझे अपत्य असून, मी या पक्षाचा बाप असल्याचे अभिमानाने सांगतो. पक्षाची नव्याने बांधणी करून आमदार निवडून आणण्याची धमक माझ्यात आहे, असे स्पष्ट प्रतिपादन मनोज परब यांनी केले. सहा महिन्यांपूर्वी आरजी तसेच राजकारणातून दूर गेलेल्या मनोज परब यांनी पर्वरी येथील जाहीर सभेत रीतसर पुन्हा आरजीत प्रवेश केला. या सभेत बोलताना त्यांनी आमदार वीरेश बोरकर यांच्यावर जोरदार टीका केली.

२०२२ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच रिंगणात उतरून आणि कोणताही पैसा खर्च न करता पक्षाला १० टक्के मते मिळाली. एक आमदार निवडून आला; मात्र त्यानंतरही आम्ही ईश्वराचे आभार मानले नाहीत, हीच आमची चूक ठरली, असे परब यांनी नमूद केले. आपली भाषा काहींना अर्वाच्च वाटत असली, तरी याच भाषेमुळे पक्षाला १० टक्के मते मिळाल्याचा दावा त्यांनी केला. वीरेश बोरकर यांना नीट बोलताही येत नव्हते, तेव्हा आपण त्यांना बोलायला शिकवले आणि आमदार केले, असे सांगत त्यांनी बोरकर यांना पुन्हा निवडणूक लढवून जिंकून दाखवण्याचे आव्हान दिले. बोरकर यांना 'टेनंट' हा शब्दही नीट उच्चारता येत नव्हता, तेव्हा आपण त्यांना मदत केली होती, अशी आठवणही त्यांनी सांगितली. ३९ अ विरोधात आझाद मैदानावर आंदोलन सुरू झाले, तेव्हा सांत आंद्रे मतदारसंघातून किती लोक त्यांच्यासोबत होते, असा प्रश्न उपस्थित करत आरजीचे कार्यकर्ते त्या वेळी आझाद मैदानावर वीरेशच्या प्रकृतीची काळजी घेत असल्याचे परब यांनी स्पष्ट केले.

या जाहीर सभेत आरजीचे खजिनदार अजय खोलकर आणि विश्वेश नाईक यांनीही आपले विचार मांडले. गोव्यासाठी क्रांती घडवून आणण्यासाठी आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मनोज परब पुन्हा येत असल्याचे खोलकर म्हणाले. हा पक्ष आणि निवडणूक चिन्ह कोणा एकाचे नसून सर्वांचेच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

मनोज परब यांनी पक्षाची स्थापना करून आपल्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना पंचायत राज कायद्याचे ज्ञान दिले, ग्रामसभेतील प्रश्न मांडायला आणि आंदोलनाची दिशा द्यायला शिकवले. ते नसल्याने आतापर्यंत आम्ही हतबल होतो;मात्र आता रडण्याचे दिवस संपले आहेत, असे खोलकर यांनी नमूद केले. २०१७ मध्ये आरजीची स्थापना झाल्यानंतर मनोज परब यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा भंगार अड्डे आणि लाला की बस्तीविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात झाली. म्हादईसाठी 'टुगेदर फॉर म्हादई' यात्रा काढण्यात आली आणि टॅक्सी व्यावसायिकांच्या हक्कांसाठीही लढा दिला गेला. या लढ्यादरम्यान त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आणि तडीपाराच्या मागण्याही झाल्या; मात्र सुरू झालेली क्रांती पुढे नेण्यासाठी ते पुन्हा सक्रिय झाले आहेत, असे खोलकर म्हणाले.


हेही वाचा
सर्व पहा