होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावर हल्ला; गोव्याचा २४ वर्षीय खलाशी सुखरूप बचावला

होर्मुझच्या सामुद्रधुनीत 'तारा गॅस' जहाजावर झालेल्या हल्ल्यातून मुरगावचा २४ वर्षीय खलाशी दिलेश तेली सुखरूप बचावला असून, त्याला लवकरात लवकर गोव्यात परत आणण्यासाठी कुटुंबीयांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावर हल्ला; गोव्याचा २४ वर्षीय खलाशी सुखरूप बचावला

वास्को : अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून आलेला थरथरता आवाज, जहाजावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती आणि आपण जिवंत असून रुग्णालयात उपचार घेत असल्याचा धीर देणारे काही शब्द, अशा काळजाचा ठोका चुकवणाऱ्या संवादातून मुरगाव येथील तेली कुटुंबीयांना त्यांचा २४ वर्षीय मुलगा होर्मुझच्या सामुद्रधुनीतील भीषण हल्ल्यातून बचावल्याचे समजले. मध्य पूर्व आशियातील वाढत्या सामरिक तणावाचे पडसाद आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार मार्गांवर उमटत असताना, त्याचे थेट चटके आता गोव्यातील सामान्य कुटुंबांनाही बसू लागले आहेत.

आपला मुलगा दिलेश चंद्रकांत तेली याच्यावर ओढवलेल्या या जीवघेण्या प्रसंगाची आठवण सांगताना वडील चंद्रकांत देवू तेली आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सागरी क्षेत्रातील करिअरची पहिलीच परदेशी मोहीम आणि नव्या स्वप्नांची सुरुवात ठरणारा हा प्रवास अचानक एका भीषण संकटात रूपांतरित झाल्याने, संपूर्ण कुटुंब दिलेशच्या सुखरूप गोवा परतीसाठी प्रार्थना करत आहे.

दिलेश पनामा देशाचा ध्वज असलेल्या 'तारा गॅस' (Tara Gas) या एलपीजी टँकर जहाजावर सहाय्यक प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून कार्यरत होता. एप्रिल २०२६ मध्ये तो या जहाजावर रुजू झाला होता आणि जानेवारी २०२७ मध्ये घरी परतणार होता. या जहाजावर एकूण २५ खलाशी कार्यरत होते, ज्यात २४ भारतीयांचा समावेश होता. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी त्याच्या आगमनाचे आनंदाने नियोजन केले होते.

खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या दिलेशच्या बहिणीने, चैताली चंद्रकांत तेली हिने १७ नोव्हेंबर रोजी घडलेला प्रसंग कथन केला. त्या दिवशी एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर वारंवार कॉल येत होते. सुरुवातीला तिने ते कॉल दुर्लक्षित केले; मात्र अखेर फोन उचलल्यानंतर पलीकडून दिलेशचा आवाज ऐकू आला. त्याचा आवाज प्रचंड थरथरत होता. जहाजावर हल्ला होऊन स्फोट झाल्याचे आणि आपण सुखरूप असून रुग्णालयात असल्याचे त्याने सांगितले. ही बातमी ऐकून चैताली पूर्णपणे हादरून गेली. काही क्षण तिला बोलताही येईना, हातपाय थरथरू लागले आणि संपूर्ण कुटुंबाची मती गुंग झाली.

टीव्ही आणि सोशल मीडियावर या हल्ल्याच्या बातम्या पसरल्यास घरचे लोक प्रचंड घाबरतील, याची जाणीव दिलेशला होती. त्यामुळे स्वतः एका भयावह अनुभवातून जात असतानाही, गोंधळाच्या परिस्थितीतून मार्ग काढत त्याने कुटुंबीयांना धीर देण्यासाठी हा संपर्क साधला होता.

दिलेशने नंतर या दुर्घटनेचा थरारक अनुभव कुटुंबीयांना सांगितला. नेहमी इंजिन रूममध्ये काम करणारा दिलेश हल्ला झाला तेव्हा दुसऱ्या कक्षात होता. हल्ल्याचा धक्का इतका जबरदस्त होता की संपूर्ण जहाज हादरले. खलाशांनी बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला असता, सर्वत्र आगीच्या ज्वाळा पसरलेल्या दिसल्या. जहाजावर गोंधळ आणि भीतीचे वातावरण पसरले असताना अनेक खलाशांची आशा मावळू लागली होती. अशा निर्णायक क्षणी मुख्य अभियंत्यांनी दाखवलेले प्रसंगावधान मोलाचे ठरले. दिलेश त्या अनुभवी अधिकाऱ्यासोबत राहिला आणि त्यांनी सर्व खलाशांना डेकच्या दिशेने मार्गदर्शन केले. संपूर्ण जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आणि सुटकेचा दुसरा कोणताही मार्ग उरला नसल्याने, खलाशांनी जीव वाचवण्यासाठी थेट समुद्रात उड्या घेतल्या.

यानंतर बचाव पथकांनी खलाशांना समुद्रातून बाहेर काढले; मात्र या घटनेत एक खलाशी बेपत्ता झाल्याचे समजते. जखमी झालेल्या दिलेशला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला असून सध्या तो एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. या आगीत दिलेशचे सर्व सामान जळून खाक झाले असून त्याचा पासपोर्टही नष्ट झाला आहे. त्यामुळे त्याच्याकडे आता कोणतीही कागदपत्रे किंवा वस्तू शिल्लक राहिलेल्या नाहीत.

मध्य पूर्व आशियातील सामरिक अस्थिरता आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या संवेदनशील सागरी मार्गांवरील वाढता धोका या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. सागरी क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. जानेवारीतील स्वागताची ओढ आणि लग्नाच्या तयारीचा उत्साह सध्या चिंतेत बदलला असून, गोवा सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून दिलेशला लवकरात लवकर मायदेशी परत आणण्यासाठी मदत करावी, अशी आर्त विनंती तेली कुटुंबीयांनी केली आहे.


हेही वाचा
सर्व पहा