पणजी : दक्षिण गोव्यात उभारण्यात येणारे दुसरे वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षापासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. जुवारी पुलावर रविवारी पहाटे सीएम ट्रॉफी मॅराथोनच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, आमदार रूडॉल्फ फर्नांडिस, माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहाटेच्या मॅराथोनसाठी ५,३३१ जणांची नोंदणी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्लीन इंडिया, स्किल इंडिया आणि फिट इंडिया उपक्रमांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्किल इंडियाअंतर्गत आयटीआयचा दर्जा उंचावण्यासाठी सरकारने २५० कोटी रुपये खर्च केल्याचेही त्यांनी नमूद केले. विकसित भारत २०४७ आणि विकसित गोवा २०३७ चे लक्ष्य गाठण्यासाठी तरुणांनी फिटनेसला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आयर्नमॅन, टेबल टेनिस आणि बुद्धीबळ स्पर्धांच्या माध्यमातून राज्यात क्रीडा संधी वाढत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


