बाणावलीत सामाजिक कार्यकर्ते क्रुझ फर्नांडिस यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला

बाणावलीतील सामाजिक कार्यकर्ते क्रुझ फर्नांडिस यांच्या घरावर अज्ञातांनी बीअरच्या बाटल्या फेकून हल्ला केला; अवैध धंद्यांविरोधी भूमिकेमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
3 hours ago
बाणावलीत सामाजिक कार्यकर्ते क्रुझ फर्नांडिस यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला

मडगाव : बाणावली येथील सामाजिक कार्यकर्ते क्रुझ फर्नांडिस यांच्या घरावर शनिवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींच्या टोळक्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरांनी घराच्या दिशेने बीअरच्या बाटल्या फेकून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याप्रकरणी कोलवा पोलीस स्थानकात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. सामाजिक विषयांवर रोखठोक भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्याच्या घरावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने बाणावली आणि परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

सामाजिक कार्यकर्ते क्रुझ फर्नांडिस यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. काही महिन्यांपूर्वीही बाणावली येथेच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ताज्या घटनेनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना फर्नांडिस यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आपण बेकायदेशीर 'धिरयो' आणि परिसरातील इतर अवैध धंद्यांविरोधात सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तपास कोलवा पोलिसांनी अद्याप पूर्ण केलेला नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि सध्या कोलवा पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या एका हवालदाराने पैसे घेऊन ते प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप फर्नांडिस यांनी केला आहे.

यासोबतच, बाणावलीचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस हेही अशा बेकायदेशीर कृत्यांना पाठबळ देत असल्याचा थेट आरोप क्रुझ फर्नांडिस यांनी केला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.


हेही वाचा
सर्व पहा