घरे जमीनदोस्त, पण गावाशी नाळ कायम!

१२ वर्षांपूर्वी सोडले गाव : नंद्रणमध्ये तुळशी विवाहाची परंपरा आजही कायम

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
just now
घरे जमीनदोस्त, पण गावाशी नाळ कायम!

फोंडा : मोले पंचायत क्षेत्रातील नंद्रण गाव इतिहासजमा झाले असले, तरी स्थलांतरित ग्रामस्थांनी आपल्या मूळ गावाशी आणि परंपरांशी असलेली नाळ आजही कायम ठेवली आहे. शनिवारी तुळशी विवाहाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी जुन्या गावात जाऊन धार्मिक विधी पार पाडत आगळ्यावेगळ्या पद्धतीने तुळशी विवाह साजरा केला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नंद्रण गावातील सुमारे ११ घरे २०१२ मध्ये मारुतीनगर-मोले येथे स्थलांतरित करण्यात आली होती. लोकवस्ती नसलेला हा भाग सध्या भगवान महावीर अभयारण्य क्षेत्रात येतो. मात्र, विविध उत्सवांच्या निमित्ताने स्थलांतरित झालेले ग्रामस्थ आजही वन खात्याच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आपल्या मूळ गावी जातात.
शनिवारी दुपारी ग्रामस्थांकडून नंद्रण येथे जाऊन रामलिंग देवस्थानासमोर पूजाअर्चा आणि तुळशी विवाह सोहळा पार पाडला. तसेच पूर्वीच्या मोडकळीस आलेल्या घरासमोरील तुळशीच्या अवशेषाची पूजा करून ग्रामस्थांनी आपली परंपरा जपली. यानंतर संध्याकाळी सर्वांनी आपल्या नवीन घरी जाऊन तुळशी विवाहाचे कार्यक्रम साजरे केले.
गावातील घरे जमीनदोस्त झाली असली, तरी रामलिंग देवस्थानात तुळशी विवाह, शिमगोत्सव, एकादशी, रक्षाबंधन आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी जाऊन पूजा करण्याची प्रथा सुरू आहे. पूर्वजांपासून काही कुटुंबे येथे राहत होती आणि त्यांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. उन्हाळ्यात (मार्च, एप्रिल, मे) विहिरींचे पाणी आटत असल्याने नळ आणि वीज जोडणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, हा परिसर महावीर अभयारण्यात येत असल्याने परवानगी मिळू शकली नाही; त्याऐवजी गरजेनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. नळ आणि वीज जोडणीसाठी दाखल याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने २०१२ मध्ये या भाग अभयारण्यात येत असल्याने स्थलांतराचा आदेश दिला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी मारुतीनगर आणि जांबोली येथे नवीन घरे बांधून वास्तव्य सुरू केले.
२० वर्षांपासून परंपरा कायम
याबाबत माहिती देताना चंद्रकांत गावकर यांनी सांगितले की, नंद्रण गाव इतिहासजमा झाले असले, तरी गेल्या २० वर्षांपासून उत्सव साजरे करताना सर्वप्रथम जुन्या गावात विधी करण्याची परंपरा सुरू ठेवण्यात आली आहे. भावी पिढीही उत्सवाच्या काळात येथे भेट देऊन पूर्वजांच्या वास्तव्याच्या जागेची पाहणी करत असल्याने ही परंपरा पुढील पिढीपर्यंतही अबाधित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.