पणजी : गोवा होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटनेतर्फे सुरुवातीला केवळ तीन वर्षांच्या कालावधीसाठी १७६ गृहरक्षक (होमगार्ड) स्वयंसेवकांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण १७६ रिक्त पदांपैकी १२७ पदे नियमित गृहरक्षक स्वयंसेवकांची, तर ४९ पदे सागरी गृहरक्षक स्वयंसेवकांची असतील. गृहरक्षक स्वयंसेवकांना सध्या प्रतिदिन ९६२ रुपये भत्ता दिला जातो.
गृहरक्षक स्वयंसेवक पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२६ आहे. उमेदवारांचे वय किमान २० वर्षे आणि कमाल ३० वर्षे असणे आवश्यक आहे. सागरी होमगार्ड पदासाठीही अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२६ आहे. मात्र, या पदासाठी उमेदवारांचे वय किमान २० वर्षे आणि कमाल ५० वर्षे हवे.
दोन्ही पदांसाठी पुरुष उमेदवारांची किमान उंची १६५ सेंटीमीटर, तर महिला उमेदवारांची किमान उंची १५५ सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल. यामध्ये पुरुष उमेदवारांना एक किलोमीटर अंतर ४ मिनिटे ३० सेकंदांत, तर महिला उमेदवारांना ८०० मीटर अंतर ४ मिनिटे ३० सेकंदांत पूर्ण करावे लागेल.
सागरी होमगार्ड पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पोहता येणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार हा मच्छीमारी व्यवसायाशी संबंधित समाजातील असावा आणि त्याचे वास्तव्य किनारपट्टी भागात असणे बंधनकारक आहे.
इच्छुक उमेदवारांनी गोवा सरकारच्या सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले १५ वर्षांचे गोवा रहिवासी प्रमाणपत्र जोडून विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. हे अर्ज कमांडंट जनरल, होमगार्ड्स आणि संचालक, नागरी संरक्षण, पणजी-गोवा यांच्या नावे सादर करायचे आहेत.
अर्जाचे नमुने २५ नोव्हेंबर २०२६ पासून सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण संघटनेचे कार्यालय, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस छावणी, आल्तिनो, पणजी येथे २० रुपये शुल्क भरून उपलब्ध होतील.
अर्ज ३१ डिसेंबर २०२६ पूर्वी जमा करणे आवश्यक
पूर्णपणे भरलेले अर्ज ३१ डिसेंबर २०२६ पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. अपूर्ण अर्ज तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणतीही पूर्वसूचना न देता नाकारण्यात येतील, असे उपकमांडंट जनरल, होमगार्ड्स आणि उपसंचालक, नागरी संरक्षण रॉय परेरा यांनी जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे.


