पणजी : हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानच्या व्यवस्थापन समितीची निवडणूक बहुप्रतिक्षित २२ नोव्हेंबर रोजीच होणार आहे. निवडणूक स्थगित करण्यास गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान, याचिकादारांनी आपली याचिका मागे घेतली असून, महाजनांच्या पात्रतेसंदर्भातील आक्षेपांसाठी प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. संबंधित अर्ज दोन महिन्यांत निकालात काढण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्या. वाल्मिकी मिनेझिस आणि न्या. अमित जामसंडेकर यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने हा आदेश दिला.
या प्रकरणी पंढरीनाथ मापारी, गुणो वस्त, नरेश जल्मी, लक्ष्मण जल्मी, उमेश मांद्रेकर, सर्वेश वस्त आणि दयेश मांद्रेकर या सात जणांनी निवडणुकीला आव्हान देत याचिका दाखल केली होती. महाजनांची पात्रता आणि नोंदणीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. राज्य सरकार, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, मामलेदार तथा देवस्थान प्रशासक, दीपक वायंगणकर आणि डिचोलीचे उपजिल्हाधिकारी यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले होते.
देवस्थान परिसरात २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी होईल. उमेदवारांना २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी मागे घेता येणार आहे.
याचिकादारांना महाजनांच्या पात्रतेसंदर्भातील आक्षेपांवर प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याची तरतूद असल्याचे न्यायालयात मांडण्यात आले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने निवडणूक स्थगित करण्यास नकार देत याचिकादारांना लवादाकडे जाण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१,७२८ महाजन मतदानास पात्र
या प्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवडणूक अधिसूचनेनुसार, २०२५-२०२८ या कालावधीसाठी १,७२८ महाजन मतदानास पात्र असल्याची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली.


