ड्रग्जप्रकरणी आरोप निश्चित करण्याचा आदेश

एनसीबीच्या पुराव्यांची न्यायालयाकडून दखल

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
5 hours ago
ड्रग्जप्रकरणी आरोप निश्चित करण्याचा आदेश

पणजी : ड्रग्ज जप्त केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे आरोपपत्रातून समोर आल्याने मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने मारिओ थिनॉक याच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाधीश शिल्पा पंडित यांनी हा आदेश दिला.
केंद्रीय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गुप्त माहितीच्या आधारे ६ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री कळंगुट येथील फिशरमन्स वॉर्फ रेस्टॉरंट परिसरात सापळा रचला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या मारिओ थिनॉक याची तपासणी केली असता, दुचाकीत एमडीएमए आणि गांजा आढळला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
इम्रान खान आरोपातून मुक्त
चौकशीत मारिओने इम्रान खान याच्याकडून १५ हजार रुपयांना ड्रग्ज खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार एनसीबीने इम्रानलाही अटक केली. तपास पूर्ण करून ६ जानेवारी २०२५ रोजी दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने इम्रान खान याला आरोपातून मुक्त केले. मारिओकडून ड्रग्ज जप्त केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याने त्याच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.            

हेही वाचा
सर्व पहा