शारीरिक संबंध न झाल्याच्या पीडितेच्या जबाबामुळे युवकाला सशर्त जामीन

१७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
15th November, 11:17 pm
शारीरिक संबंध न झाल्याच्या पीडितेच्या जबाबामुळे युवकाला सशर्त जामीन

पणजी : पीडित मुलगी आणि संशयित यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले नसल्याचा जबाब पीडित मुलीने दिला. पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांनी जबाब फिरविल्यामुळे मेरशी येथील पाॅक्सो न्यायालयाने सासष्टी तालुक्यातील २७ वर्षीय संशयित युवकाला ३० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. याबाबतचा आदेश डाॅ. पूजा कवळेकर यांनी दिला.

या प्रकरणी मायना - कुडतरी पोलिसांनी ४ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, या प्रकरणी १७ वर्षीय मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. त्यात सासष्टी तालुक्यातील २७ वर्षीय संशयित युवकाने १७ वर्षीय मुलीशी मैत्री करत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयिताने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवत १० ऑगस्ट २०२५ ते ३ मार्च २०२६ या कालावधीत तिला फिरायला नेत अनेकदा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार पीडितेच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मायना - कुडतरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनल गावकर यांनी संशयित युवकाविरोधात भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्याच्या २०१२ (पाॅक्सो) विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर संशयित युवकाला अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासपूर्ण करून लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तसेच फसवणुकीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी ६ मे २०२६ रोजी मेरशी येथील पाॅक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याच दरम्यान संशयित युवकाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, मुलीचा जबाब नोंद करण्यात आला. त्यात तिने संशयित युवकाविरोधात कोणतीच तक्रार नाही. आमच्यात असे काहीच झाले नसल्याचा जबाब दिला. या संदर्भात पीडित मुलीच्या नातेवाईकांनी जबाब फिरविला. याची दखल घेऊन न्यायालयाने संशयित युवकाला ३० हजार रुपये, पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांवर दबाव न टाकणे व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.

जबाब फिरविल्याने युवकाला जामीन

पीडित मुलीने संशयितासोबत शारीरिक संबंध झाले नसल्याचा जबाब न्यायालयात दिला. तसेच पीडिता व तिच्या नातेवाईकांनी आधीच्या तक्रारीतील आरोपांबाबत जबाब फिरविल्याची दखल न्यायालयाने घेतली. यानंतर युवकाला ३० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला. 

हेही वाचा
सर्व पहा