सांगे : दुसऱ्यांच्या आधारावर आणि इतरांना आधार देऊन निवडणुका लढविण्याचे दिवस आता पूर्णपणे संपले आहेत. आता ‘आम्ही ठरवू तोच उमेदवार’ असा ठाम निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आरक्षणाची प्रतीक्षा करत न बसता, आता नाही तर पुढच्या निवडणुकीतही आरक्षण मिळणार नाही हे गाठीशी बांधून, आगामी विधानसभा निवडणुकीत आपलाच उमेदवार विजयी करून आणायचा असा निर्धार करा आणि उर्वरित दिवसांत संपूर्ण परिसर पिंजून काढा, असे आवाहन आमदार गोविंद गावडे यांनी केले.
वाडे कुर्डी येथील वसाहत क्रमांक एक मधील गणपती सभा मंडपात अनुसूचित जमातीच्या (एसटी) राजकीय आरक्षणासाठी आयोजित विशेष मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रकाश वेळीप, गोविंद शिरोडकर, जॉन फर्नांडिस, विश्वास गावडे, माजी आमदार प्रसाद गावकर, सुरेश केपेकर, नानू बांडोळकर, संतोष गावकर यांच्यासह अनेक स्थानिक नेते उपस्थित होते.
समाजात फूट कशी पाडावी, हे सध्याच्या राजकारण्यांकडून शिकावे, अशी टीका करताना आमदार गावडे म्हणाले की, वाडे कुर्डीतील हा मेळावा आठ दिवस अगोदर ठरलेला असताना, नेमका त्याच वेळी दुसरा कार्यक्रम आयोजित करून एकाच समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाला खोटी आश्वासने देऊन तोडण्याचे काम सुरू असून, समाज एकसंघ होत नसल्याचा फायदा घेत काही जण आपली पोळी भाजून घेत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
प्रकाश वेळीप म्हणाले की, आता केवळ अपेक्षा ठेवण्याचे दिवस संपले असून, सर्वांनी आपली ताकद एकवटून लढा देण्याची वेळ आली आहे. राजकीय इच्छाशक्ती असेल तर कोणताही निर्णय घेणे शक्य असते; मात्र गोव्यात सध्या तशी परिस्थिती राहिलेली नसून आता आपली खरी ताकद दाखवून देण्याची हीच योग्य वेळ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या मेळाव्यात माजी आमदार प्रसाद गावकर, सुरेश केपेकर, जॉन फेर्नांडिस व इतर वक्त्यांनीही आपल्या मनोगतात समाजाला राजकीय आरक्षणासाठी एकजूट राखण्याचे आणि संघटित होऊन लढा देण्याचे आवाहन केले.
मत विकू नका, धमक दाखवा : जॉन फर्नांडिस
जॉन फर्नांडिस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अत्यंत आक्रमक भूमिका मांडली. ते म्हणाले की, आतापर्यंत आपले मत विकल्यामुळेच इतर लोक मोठे झाले. आताही तशीच परिस्थिती निर्माण केली जाईल आणि गरिबीचा फायदा घेण्यासाठी रात्रीच्या वेळी पाचशे रुपये देऊ केले जातील. मात्र, आपल्या मताची एवढी खालची किंमत करून न घेता, ते पैसे देणाऱ्यांच्या तोंडावर मारण्याची धमक समाजबांधवांनी दाखवली पाहिजे; तरच राजकारणात आपली किंमत निर्माण होईल.


