म्हापसा : वाडी -शिवोली येथील सेबेस्तिना फर्नांडिस यांच्या घराला आग लागून सुमारे २ लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले.फर्नांडिस यांनी घराच्या स्वयंपाक खोली शेजारील चूल पेटवली होती. घरातील मंडळी झोपी गेल्यावर या चुलीतील आग भडकली आणि स्वयंपाक खोलीला लागली.
ही दुर्घटना शुक्रवारी उत्तररात्री १२.५०च्या सुमारास घडली. आगीचा धूर संपूर्ण घरात पसरल्यानंतर घराला आग लागल्याचे लक्षात आले. फर्नांडिस कुटुंबीयांनी आरडाओरड केली. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत या कुटुंबीयांना घराबाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अरुंद वाटेमुळे दलाने लहान पाण्याचा बंब नेत ही आग नियंत्रणात आणली. आगीत स्वयंपाक खोलीतील सर्व सामान जळून खाक झाले. तसेच घराच्या छप्पराचे वासे व कौलांचे नुकसान झाले. ५ लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात जवानांना यश आले.
म्हापसा अग्निशमन दलाचे उपअधिकारी प्रकाश कान्नाईक, स्वप्नेश कळंगुटकर, पी. डी. घाडी, चंद्रकांत नाईक, दत्तराज च्यारी, अशोक वळवईकर व अमित फडते यांनी स्थानिकांच्या मदतीने ही आग नियंत्रणात आणली.


