दाबोळी विमानतळासमोरील रस्ता ओलांडणे बनले जीवघेणे!

दोन वर्षांत पाच जणांचा मृत्यू : दक्षिण गोवा रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 mins ago
दाबोळी विमानतळासमोरील रस्ता ओलांडणे बनले जीवघेणे!

दाबोळी विमानतळासमोरील रस्ता ओलांडताना गेल्या दोन वर्षांत पाच जण मृत्युमुखी पडल्याची गंभीर दखल घेत दक्षिण गोवा रस्ते सुरक्षा समितीने या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. येथील अपघात कसे रोखता येतील आणि प्रवाशांसाठी बसथांब्याबाबत काय उपाययोजना करता येतील, यावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या २० तारखेला दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत या पाहणीचा सविस्तर अहवाल व प्रस्ताव मांडण्यात येणार आहे, अशी माहिती ‘गोवा कॅन’चे समन्वयक रोलँड मार्टिन्स यांनी दिली.

दाबोळी विमानतळासमोरील रस्ता सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत आला आहे. येथे तातडीने योग्य सुरक्षा उपाययोजना करण्याची गरज असतानाही संबंधित खात्यांचे याकडे दुर्लक्ष होत होते. अखेर दक्षिण गोवा रस्ते सुरक्षा समितीच्या पुढाकाराने झालेल्या या पाहणीवेळी वाहतूक खात्याचे अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी) तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रतिनिधी उपस्थित होते.

सूचना फलकांचा अभाव, जीवघेणी कसरत

विमानतळासमोरील बसथांब्यावर बस पकडण्यासाठी रस्ता ओलांडताना प्रवासी आणि पादचारी अपघाताला बळी पडत आहेत. रस्त्यावर लोखंडी कुंपण घालण्यात आले असले, तरी नागरिक त्यातून वाट काढून जीव धोक्यात घालून रस्ता पार करतात. रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित सोयींचा अभाव असून नेमका कुठून रस्ता ओलांडावा, याचे कोणतेही दिशादर्शक फलक येथे नाहीत.

शिवाय मांगोरहिल आणि चिखली बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे या भागात वाहतुकीचा मोठा गोंधळ निर्माण होतो. वाहतूक नियमांचे फलक नसल्याने दुचाकीचालकांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव : रोलँड मार्टिन्स

प्रवासी व पादचाऱ्यांसमोरील सुरक्षेचे धोके दूर करण्यासाठी समिती ठोस पावले उचलत आहे. येथे अधिकृत बसथांबा आणि पुरेशी सुरक्षा चिन्हे नसल्याने अपघात घडत आहेत. रस्ते अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने संयुक्त शिफारशी तयार केल्या जात आहेत.

विविध संबंधित सरकारी विभाग आपापल्या परीने काम करतात, मात्र त्यांच्यात समन्वयाचा स्पष्ट अभाव दिसून येतो, असे रोलँड मार्टिन्स यांनी स्पष्ट केले.