खानापुर दिवाळीचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी गोव्याहून मूळ गावी परतणाऱ्या एका तरुण नोकरदाराच्या प्रवासाचा अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. खानापूर-चोर्ला मार्गावरील कालामणी गावाजवळ दुचाकी आणि मिनी व्होल्वो टुरिस्ट बस यांच्यात झालेल्या भीषण धडकेत २७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. महेश परशराम मादार (वय २७, रा. ढोकेगाळी, ता. खानापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेव्यतिरिक्त चोर्ला घाट परिसरात दुपारी घडलेल्या दुसऱ्या एका दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही मृत्यू झाल्याने या मार्गावर एकाच दिवसात एकूण ३ जणांचा बळी गेला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, महेश मादार हा गोव्यातील विमानतळावर नोकरीला होता. दिवाळीच्या सणानिमित्त कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आणि सणाचा आनंद साजरा करण्यासाठी तो रविवारी सकाळी दुचाकीने आपल्या ढोकेगाळी येथील घराकडे निघाला होता. मात्र, कालामणी गावाजवळ समोरून येणाऱ्या मिनी व्होल्वो बसशी त्याच्या दुचाकीची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की महेश गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि उपचारापूर्वीच त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला.
घटना घडताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दीपक कवठणकर यांनी प्रसंगावधान राखून रुग्णवाहिकेला पाचारण केले, परंतु उपचारापूर्वीच महेशची प्राणज्योत मालवली होती. खानापूरचे पोलीस निरीक्षक एल. एच. गवंडी यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवला. पोस्ट मोर्टेमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान, याच मार्गावर दुपारी चोर्ला घाटात चोर्ला गावाजवळ आणखी एक दुचाकीचा अपघात घडला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही दुचाकीस्वारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ऐन सणासुदीच्या काळात चोर्ला मार्गावर घडलेल्या या दोन भीषण अपघातांमुळे ढोकेगाळी गावावर आणि परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.


