प्रतिनिधी गोवन वार्ता
पणजी
आरोग्य खात्यातर्फे ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ उपक्रमांतर्गत स्तनाच्या कर्करोगासाठी ३.१५ लाखांहून अधिक महिलांची तपासणी पूर्ण झाली आहे. यामधील ९६ महिलांना कर्करोगाचे निदान झाले आहे. तर ३,९२५ संशयित नमुन्यांची पुढील चाचणी आणि वैद्यकीय मूल्यांकन केले जाणार आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून राज्यातील ३० वर्षांवरील ७० टक्क्यांहून अधिक महिलांची तपासणी पूर्ण झाली आहे. हा स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीत ऐतिहासिक टप्पा आहे. २०२७ पर्यंत या वयोमर्यादेत बसणाऱ्या सर्व महिलांची तपासणी करण्याचे आरोग्य खात्याचे उद्दिष्ट आहे. डॉ. अनुपमा बोरकर म्हणाल्या की, या उपक्रमाद्वारे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झालेल्या प्रत्येक कर्करोगामागे एक जीवन वाचवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या दूरदृष्टीमुळे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहयोगाने आम्ही रुग्णांवर वेळेवर उपचार करू शकलो. अशा तपासणीमुळे स्तनाच्या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात करता येते आणि जगण्याचा दर वाढू शकतो.
हा उपक्रम एसबीआय फाऊंडेशन आणि युवराज सिंग फाऊंडेशनच्या (यूवीकॅन) सहयोगाने राबवला जात आहे. यामध्ये आयब्रेस्ट एक्झामचा वापर करून राज्यभरात स्तन तपासणीची व्याप्ती वाढवण्यात येत आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश तपासणी सेवा थेट समुदायांपर्यंत पोहोचवणे, तसेच राज्यातील महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी अधिक सुलभ बनवणे हा होता. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात आणखी ५०,००० महिलांची तपासणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

उपक्रम तपासणीसाठी न येणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, लोकांनी रुग्णालयात येण्याची वाट पाहण्यापेक्षा आरोग्यसेवा थेट त्यांच्या घरापर्यंत नेणे हा नेहमी आमचा दृष्टिकोन राहिला आहे. ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’च्या माध्यमातून आम्ही ६ वर्षांपासून महिलांकरिता स्तन तपासणी अधिक सुलभ करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून गोव्यातील ठरावीक वयोमर्यादेत बसणाऱ्या सर्व महिलांपर्यंत पोहोचणे हे आमचे उद्दिष्ट आहे. हा उपक्रम स्वतःहून तपासणीसाठी येत नसणाऱ्या महिलांसाठी उपयुक्त ठरत आहे.

उपक्रमामुळे सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान शक्य
गोवा मेडिकल कॉलेजचे डीन प्रा. डॉ. जय प्रकाश तिवारी म्हणाले की, तपासणी मोहीम अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचते, तेव्हा मोहिमेचा प्रभाव अधिक व्यापक ठरतो. ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील रेफरल प्रक्रिया प्रबळ करत महिलांच्या दारापर्यंत स्तन तपासणी सेवा पोहोचवण्यास मदत केली आहे. या उपक्रमामुळे आम्हाला सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान करणे शक्य होत आहे.


