ब्रिटिश महिला पर्यटकावर बलात्कार, लूटमारप्रकरणी आरोपी दोषी

२२ साक्षीदारांची साक्ष नोंद : १६ नोव्हेंबरला न्यायालय सुनावणार शिक्षा

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
07th November, 11:24 pm
ब्रिटिश महिला पर्यटकावर बलात्कार, लूटमारप्रकरणी आरोपी दोषी

मडगाव : काणकोण येथील पाळोळे परिसरात ४८ वर्षीय ब्रिटिश महिला पर्यटकावर बलात्कार करून तिची लूट केल्याच्या २०१८ मधील प्रकरणात दक्षिण गोवा जिल्हा प्रधान सत्र न्यायालयाने रामचंद्रन चेंढायेलप्पा याला दोषी ठरवले आहे.

न्यायाधीश शर्मिला पाटील यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली असून, दोषीला येत्या १६ नोव्हेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. २० डिसेंबर २०१८ रोजी ही घटना घडली होती. रेल्वे उशिरा पोहोचल्याने पीडित महिला पहाटे ४ ते ४.३० च्या सुमारास काणकोण रेल्वे स्थानकावरून आपल्या निवासस्थानी पायी जात होती. यावेळी निर्जन रस्त्याचा फायदा घेत आरोपीने तिचा रस्ता अडवून तिला जवळच्या शेतात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिच्या तीन बॅगा घेऊन त्याने पळ काढला. या बॅगांमध्ये २० हजार रुपये रोख, पासपोर्ट, डेबिट कार्ड आणि अन्य महत्त्वाच्या वस्तू होत्या.

या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर त्याला मडगाव रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. तपासादरम्यान मोरजी येथील एका हॉटेलमधून ३२ लाख रुपये चोरल्याच्या अन्य गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा ऐवज आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त केली होती.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३९४ आणि २०१ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान सरकारी वकील संजय सामंत यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायालयात एकूण २२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. आता १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे.

अन्य गुन्ह्यातही होता आरोपीचा सहभाग

तपासादरम्यान मोरजी येथील एका हॉटेलमधून ३२ लाख रुपये चोरल्याच्या अन्य गुन्ह्यातही त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त केली होती.

हेही वाचा
सर्व पहा