पैंगीण : गुळे येथे मंगळवारी रात्री एका तरुणाने हातात लोखंडी कोयता घेऊन रस्त्यावर धावपळ केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीत राहणाऱ्या लोहार कुटुंबातील २५ वर्षीय समीर चौहान हा अचानक हातात कोयता घेऊन सैरावैरा पळू लागला. काही गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्याने रस्त्यावरील वाहनेही अडवली.
या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी पोहोचताच समीर जवळच्या जंगलात पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली. मात्र, रात्री त्याचा शोध लागला नाही. बुधवारी पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरू केल्यावर पोलिसांनी त्याला जंगलातून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरला प्रथम सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याचे वर्तन सामान्य नसल्याचे सांगितले. तसेच पुढील तपासणीसाठी त्याला बांबोळी येथील मानवी वर्तन संस्थेत (आयपीएचबी) पाठवण्याचा सल्ला दिला. दरम्यान, पोलिसांनी त्याला काणकोण येथील प्रथमवर्ग न्यायालयात (जेएमएफसी) हजर केले. न्यायालयानेही त्याला बांबोळी येथील आयपीएचबीमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबात आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश असून, हे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून गुळे येथे रस्त्याच्या कडेला झोपडी उभारून लोहारकाम करत होते. मात्र, समीर हा अवघ्या दोन दिवसांपूर्वीच गोव्यात आला होता.
दरम्यान, ग्रामस्थांच्या मागणीनुसार कुटुंबाची झोपडी पाडण्यात आली असून, हे कुटुंब आपल्या मूळ गावी परतल्याचे समजते.


