‘गोवन वार्ता’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत संपादक पांडुरंग गावकर, रवींद्र पाटील, अमित पोकळे आणि प्रदीप जोशी. (कैलास नाईक)
गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
गोमंतकीय वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘गोवन वार्ता’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले. आल्तिनो-पणजी येथील ‘महालक्ष्मी’ निवासस्थानी बुधवारी सायं. ५ वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा सोहळा झाला. यावेळी ‘गोवन वार्ता’चे संपादक पांडुरंग गावकर, जाहिरात डीजीएम रवींद्र पाटील, जाहिरात व्यवस्थापक अमित पोकळे आणि उपवृत्त संपादक प्रदीप जोशी उपस्थित होते.
यंदाच्या दिवाळी अंकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गोमंतकातील पारंपरिक कष्टकरी समाजावर असलेले विशेष लेख. यात समुद्राशी झुंजणारा मच्छीमार, झाडावर चढणारा रेंदेर, पहाटेच ताजे पाव आणणारा पोदेर, मातीला आकार देणारा कुंभार, सुगंधी विश्वातील फूलकार आणि पारंपरिक वकतोळी या कष्टकऱ्यांच्या संघर्षमय व समृद्ध जीवनावर प्रभावीपणे प्रकाश टाकण्यात आला आहे. दिवाळी अंकातून गोव्यातील कष्टकरी समाजाच्या जीवनावर प्रकाश टाकल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुकोद्गार काढले.
साहित्यप्रेमींसाठी या अंकात नामवंत कथाकारांच्या ८ उत्कृष्ट कथा आणि १७ दर्जेदार कवितांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, आयएफएस नंदकुमार परब यांनी वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा अभयारण्यातील आपल्या सफारीच्या अनुभवांवर लिहिलेला ‘ताडोबा’ हा लेख विशेष आकर्षण ठरणार आहे. ज्ञानाचा आणि मनोरंजनाचा हा १४६ पानांचा समृद्ध खजिना वाचकांसाठी अवघ्या २०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा दिवाळी अंक आजपासूनच राज्यातील सर्व प्रमुख बुक स्टॉल्सवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.


