म्हापसा : दिवाळीसाठी गावी निघालेल्या कामगारांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार म्हापशात उघडकीस आला आहे. गोवा ते नेपाळ मार्गावर धावणाऱ्या अवघ्या ४८ आसनक्षमता असलेल्या खासगी बसमधून तब्बल १४० प्रवाशांची वाहतूक केली जात होती. म्हापसा वाहतूक पोलिसांनी बोडगिणी येथे ही बस अडवून कारवाई केली. या प्रकरणाची वाहतूक खात्याकडून चौकशी सुरू आहे.
मंगळवारी मध्यरात्री गस्तीवर असलेले वाहतूक पोलीस उपनिरीक्षक विकास मापारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. ही बस म्हापशाहून मध्य प्रदेशातील इंदूर आणि त्यानंतर उत्तर प्रदेशमार्गे नेपाळ सीमेच्या दिशेने जात होती. गेल्या चार वर्षांपासून आठवड्यातून एकदा या मार्गावर बस धावत असल्याचे समोर आले आहे.
गोव्यात विविध ठिकाणी काम करणारे नेपाळ आणि उत्तर प्रदेशातील कामगार दिवाळीसाठी गावी परतत आहेत. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, दोन प्रवाशांच्या जागेवर सात ते आठ जणांना बसवण्यात आले होते. या धोकादायक प्रवासासाठी प्रत्येकाकडून चार हजार रुपये तिकीट आकारण्यात आले होते. मध्य प्रदेशात नोंदणी असलेल्या या ‘सीटर-कम-स्लीपर’ बसमध्ये प्रवासी सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचेही उघड झाले.
आंतरराज्य तपासणी नाक्यांवर बस अडवली गेल्यास ३० ते ४० हजार रुपये दंड भरून पुढे जाता येत असल्याची कबुली चालकाने दिली. त्यामुळे तपासणी नाके आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
म्हापसा वाहतूक पोलिसांनी बस जप्त करून नवीन कदंब बसस्थानकावर ठेवली आहे. कारवाईनंतर चालक प्रवाशांना सोडून निघून गेल्याने महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह १४० प्रवासी मध्यरात्री उघड्यावर अडकले. बुधवारी दिवसभर हे प्रवासी बसस्थानकावरच होते. त्यांना तिकिटाचे पैसे परत मिळाले नाहीत किंवा पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. बसवर कारवाई झाली असली, तरी प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या पुढील प्रवासाची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पुढील कारवाईसाठी प्रकरण वर्ग
वाहतूक पोलिसांनी चालकाला मोटार वाहन कायद्यानुसार चलन दिले आहे. बसचा वैध परवाना, परमिट आणि बदललेल्या आसनव्यवस्थेची तपासणी करण्यासाठी हे प्रकरण म्हापसा वाहतूक कार्यालयाकडे पाठवण्यात आले. तेथून पुढील कारवाईसाठी अंमलबजावणी विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. या विभागाचा अहवाल मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस कायदेशीर दंडात्मक कारवाईसाठी प्रकरण न्यायालयात सादर करणार आहेत. तोपर्यंत आणखी दोन ते तीन दिवस बस पोलिसांच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे.


